Home क्राईम नांदेड येथे अवैध वाळू साठ्यावर महसूल विभागाची धडक कारवाई; संयुक्त पथकाने साठा...

नांदेड येथे अवैध वाळू साठ्यावर महसूल विभागाची धडक कारवाई; संयुक्त पथकाने साठा केला जप्त

0
23


धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मौजे नांदेड येथे अवैधरीत्या वाळूचा साठा करून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ११ सप्टेंबर २०२६ रोजी धडक कारवाई केली. या कारवाईत अवैध वाळू साठा जप्त करण्यात आला असून, प्रशासनाच्या कारवाईमुळे अवैध वाळू साठवणूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी तसेच धरणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. नांदेड येथे अवैधरीत्या वाळू साठवून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल विभागाने त्याची पडताळणी करून पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने संयुक्त पथकाच्या माध्यमातून कारवाई केली.

या कारवाईमध्ये नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, मंडळ अधिकारी राकेश काळमेघ, तलाठी संदेश महाजन (नांदेड), तलाठी गौरव बाविस्कर (रोटवद), तलाठी चंद्रकांत बोरसे (निशाणे), ग्रामसेवक अनिल मोतीराडे (नांदेड), महसूल सेवक शितलकुमार पवार (साकरे), महसूल सेवक भूषण खोंडे (नांदेड) तसेच पोलीस कॉन्स्टेबल संजय चव्हाण यांनी सहभाग घेतला.

महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने घटनास्थळी पाहणी करून अवैधरीत्या साठवून ठेवलेला वाळूसाठा जप्त केला. अवैध वाळू उपसा, वाहतूक आणि साठवणुकीला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असून, नांदेड येथील ही कारवाई त्याच मोहिमेचा एक भाग असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, अवैध वाळू साठ्याविरोधात झालेल्या या कारवाईमुळे परिसरातील वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून वाळूचा अवैध साठा किंवा वाहतूक करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा संदेश या कारवाईतून मिळाला आहे.


Protected Content

Play sound