


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावहून यावल येथे परतत असताना बोरावल गावाजवळ जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे भलेमोठे झाड अचानक मुख्य रस्त्यावर कोसळले. झाड रस्त्यावर आडवे पडल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. सुमारे तासभर वाहतूक बंद राहिल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही.
या घटनेच्या वेळी यावल नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. छाया अतुल पाटील व नगरसेवक अतुल पाटील हे त्याच मार्गावरून जात होते. रस्त्यावर मोठे झाड कोसळल्याने निर्माण झालेली परिस्थिती लक्षात येताच त्यांनी विलंब न करता मदतकार्याला सुरुवात केली.
नगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच नगरसेवक अतुल पाटील यांनी बोरावल येथील मित्र शांताराम धनगर, उमेश पाटील व अमोल राणा यांच्याशी संपर्क साधून त्यांना तातडीने घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर रस्त्यावर पडलेले झाड हटविण्यासाठी प्राथमिक स्वरूपात प्रयत्न सुरू करण्यात आले. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहनांना सुरक्षितपणे मार्ग मिळावा, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले.
दरम्यान, नगराध्यक्षा छाया पाटील यांनी यावल नगरपरिषदेच्या संबंधित कर्मचाऱ्यांशी तातडीने संपर्क साधला. त्यांनी रेस्क्यू व्हॅन तसेच जेसीबी मशीन घटनास्थळी पाठविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार नगरपरिषदेचे कर्मचारी आणि जेसीबी घटनास्थळी दाखल झाले.
नगराध्यक्षा छाया पाटील यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीची पाहणी केली आणि झाड हटविण्याच्या कामाबाबत आवश्यक सूचना दिल्या. जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर कोसळलेले भलेमोठे झाड बाजूला करण्यात आले. झाड हटवल्यानंतर रस्त्यावरील अडथळा दूर झाला आणि काही वेळातच वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे काही काळ वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, नगराध्यक्षा छायाताई पाटील आणि नगरसेवक अतुल पाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने मदतकार्य सुरू केल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.
बोरावल येथील नागरिकांसह वाहनचालक आणि प्रवाशांनी झाड हटविण्यासाठी करण्यात आलेल्या तत्पर प्रयत्नांचे कौतुक केले. प्रशासनाच्या यंत्रणेला तातडीने सक्रिय करून प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून कामाला गती दिल्याबद्दल छाया पाटील व अतुल पाटील यांचे नागरिकांनी आभार व्यक्त केले.



