


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील घोरसगाव, कुंड परिसरातील चिमणी विटभट्ट्यांसाठी मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात राख आणली जात असून, ही वाहतूक पूर्णाड फाटा येथील सीमा तपासणी नाका व वजनकाटा चुकवून अंतुर्ली–नायगाव–पुर्नाड मार्गे केली जात असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते अमोल बाबुराव बोदडे यांनी केला आहे. निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक राख वाहून नेणाऱ्या वाहनांवर कारवाई होत नसल्याचा आरोप करत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची परिवहन आयुक्तांनी स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
अमोल बोदडे यांच्या म्हणण्यानुसार, पूर्णाड फाटा येथील सीमा तपासणी नाका आणि तेथील वजनकाटा टाळण्यासाठी राख वाहतूक करणारी वाहने पर्यायी मार्गाचा वापर करीत आहेत. अंतुर्ली, नायगाव आणि पुर्नाडमार्गे ही वाहने घोरसगाव व कुंड परिसरातील चिमणी विटभट्ट्यांपर्यंत पोहोचत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या मार्गावर दररोज मोठ्या संख्येने वाहने धावत असून, त्यातील काही वाहनांमध्ये वाहनाच्या निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक राख भरली जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
सीमा तपासणी नाक्यावर वाहनांचे वजन, आवश्यक कागदपत्रे आणि वाहतुकीशी संबंधित नियमांची तपासणी होणे अपेक्षित असताना मोठ्या प्रमाणात वाहने पर्यायी मार्गाने जात असल्यास शासनाच्या महसुलावर त्याचा परिणाम होत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे मागील काही वर्षांतील पूर्णाड फाटा सीमा तपासणी नाक्यावरील वजनकाटा नोंदी, वाहन तपासणी रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज, ई-चलान, दंडवसुली तसेच संबंधित वाहनांच्या हालचालींच्या इलेक्ट्रॉनिक नोंदी तपासण्यात याव्यात, अशी मागणी बोदडे यांनी केली आहे.
ओव्हरलोड वाहतुकीमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचा संशय व्यक्त करत, प्रत्यक्षात किती वाहने तपासणीपासून वंचित राहिली, किती ओव्हरलोड वाहनांवर कारवाई झाली आणि त्यातून किती दंड वसूल करण्यात आला, याची सखोल चौकशी करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अंतुर्ली ते पूर्णाडदरम्यानच्या गावांमधून ही वाहतूक सुरू ठेवण्यासाठी काही राजकीय प्रभाव असलेल्या व्यक्ती तसेच गावगुंडांचा हस्तक्षेप असल्याची चर्चा तालुक्यात असल्याचा आरोप बोदडे यांनी केला. वाहतूक रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्थानिक नागरिकांवर दबाव आणण्यासाठी काही व्यक्तींचा वापर केला जात असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या आरोपांची अधिकृत चौकशी होऊन वस्तुस्थिती स्पष्ट होणे आवश्यक आहे.
या वाहतुकीमध्ये प्रति टिप्पर सुमारे १० हजार रुपयांच्या आर्थिक व्यवहाराची चर्चा असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. कथित आर्थिक व्यवहाराचा संबंध वाहतूक सुरळीत ठेवण्याशी आहे का आणि त्यामध्ये कोणाचा सहभाग आहे, याची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी, अशी मागणी बोदडे यांनी केली आहे.
या कथित आर्थिक व्यवहाराच्या चर्चेत सीमा तपासणी नाक्यावर कार्यरत मोटार वाहन निरीक्षक किंवा संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचा कोणताही सहभाग आहे का, याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र, या आरोपांची सत्यता अधिकृत तपासणीतूनच स्पष्ट होऊ शकते, असेही बोदडे यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे संबंधित कालावधीतील अधिकाऱ्यांचे ड्युटी चार्ट, उपस्थिती नोंदी, तपासणी नोंदवही, वजनकाटा रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज, ई-चलान आणि दंडात्मक कारवाईची माहिती तपासावी. तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात ओव्हरलोड वाहनांवर झालेल्या कारवाईची आकडेवारी आणि प्रत्यक्ष वाहतुकीचे प्रमाण यांची तुलना करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
घोरसगाव व कुंड परिसरात मोठ्या प्रमाणावर चिमणी विटभट्ट्या सुरू असून, दरवर्षी कोट्यवधी विटांचे उत्पादन होत असल्याचे सांगण्यात येते. या विटभट्ट्यांसाठी आवश्यक असलेल्या राखेची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने या संपूर्ण वाहतूक साखळीची तपासणी करण्याची गरज असल्याचे बोदडे यांनी म्हटले आहे.
राख नेमकी कोणत्या ठिकाणाहून आणली जाते, कोणत्या वाहनांमधून तिची वाहतूक केली जाते, संबंधित वाहनांची अधिकृत वाहून नेण्याची क्षमता किती आहे, प्रत्यक्षात किती माल वाहून नेला जातो, कोणत्या विटभट्टीवर राख उतरविली जाते, वाहतुकीसाठी कोणता मार्ग वापरला जातो आणि संबंधित वाहनांवर यापूर्वी किती कारवाई झाली, याची माहिती परिवहन विभागाने सार्वजनिक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणाची स्थानिक पातळीवर केवळ कागदोपत्री चौकशी न करता परिवहन आयुक्तांनी स्वतंत्र पथक नियुक्त करावे, अशी मागणी बोदडे यांनी केली आहे. या पथकाने पूर्णाड फाटा सीमा तपासणी नाका, अंतुर्ली–नायगाव–पुर्नाड मार्ग तसेच घोरसगाव–कुंड परिसरातील चिमणी विटभट्ट्यांची अचानक तपासणी करावी. प्रत्यक्ष वाहतूक, वाहनांचे वजन आणि तपासणी नोंदी यांची पडताळणी केल्यास या आरोपांमागील वस्तुस्थिती समोर येऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे.
चौकशीत ओव्हरलोड वाहतूक, सीमा तपासणी नाका चुकविणे, नियमबाह्य वाहतूक किंवा कोणत्याही प्रकारचे आर्थिक हितसंबंध आढळल्यास संबंधित वाहनमालक, भट्टीमालक, मध्यस्थ तसेच दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
“ही बाब केवळ वाहतूक नियमांपुरती मर्यादित नसून शासनाचा महसूल, सार्वजनिक रस्त्यांची सुरक्षितता आणि नागरिकांच्या जीविताशी संबंधित आहे. त्यामुळे सीमा तपासणी नाक्यावरील वजनकाटा, सीसीटीव्ही, वाहन तपासणी रेकॉर्ड आणि कथित आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे,” अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल बाबुराव बोदडे यांनी पत्रकार परिषदेत केली.



