


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आगामी गणेशोत्सवाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू असतानाच जळगाव शहरातील नवी पेठेतील जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या काही तासांवर गणेशोत्सव येऊन ठेपलेला असताना, अत्यंत श्रद्धेने आणलेल्या गणरायाच्या मूर्तीवर साज चढवताना ती ओली होऊन खंडित होत असल्याचे समोर आले. त्यामुळे अत्यंत जड अंतःकरणाने आणि मनावर दगड ठेवून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यापूर्वीच क्रेनच्या सहाय्याने मेहरूण तलावात भावपूर्ण विसर्जन केले.
जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवासाठी तब्बल सहा महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथून आकर्षक गणेशमूर्ती बुक करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वीच मंडळाचे कार्यकर्ते अत्यंत उत्साहात व वाजतगाजत ही मूर्ती जळगावात घेऊन आले होते. मात्र, आज गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला जेव्हा मूर्तीवर रंगकाम आणि सजावटीचा साज चढवण्याचे काम सुरू करण्यात आले, तेव्हा कार्यकर्त्यांना एक धक्कादायक बाब निदर्शनास आली. ही मूर्ती आतून पूर्णपणे ओली असल्याचे आणि तिचे प्लास्टर सुटून ती हळूहळू खंडित होत असल्याचे कार्यकर्त्यांच्या लक्षात आले.
पाहता पाहता गणेशमूर्तीचा काही भाग तुटून खाली पडू लागल्याने कार्यकर्त्यांच्या आनंदावर आणि उत्साहावर विरजण पडले. शास्त्रानुसार खंडित झालेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणे अयोग्य मानले जात असल्याने, मंडळाचे अध्यक्ष भूषण जोशी आणि सर्व कार्यकर्त्यांनी अत्यंत दुःखी मनाने या मूर्तीचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण प्रकाराबाबत स्थानिक पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली. त्यानंतर आज दुपारी विशेष क्रेन मागवून या भव्य गणेशमूर्तीला अत्यंत सुरक्षितपणे मेहरूण तलावापर्यंत नेण्यात आले.
तलावाच्या काठावर डोळ्यांत अश्रू आणि मनात बाप्पाच्या आठवणी घेऊन कार्यकर्त्यांनी प्रतिष्ठापनेपूर्वीच आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण नवी पेठ परिसरात आणि गणेश भक्तांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ऐन उत्सवाच्या तोंडावर कार्यकर्त्यांच्या भावनांशी खेळणाऱ्या आणि कच्च्या-ओल्या मूर्तीची विक्री करणाऱ्या संबंधित बऱ्हाणपूर येथील मूर्तिकारावर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी संतप्त मागणी जळगावातील गणेश भक्तांकडून केली जात आहे.



