


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बैलपोळा हा केवळ बैलांची पूजा करण्याचा पारंपरिक सण नाही, तर शेतकरी आणि त्याच्या जिवाभावाच्या सर्जा-राजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे. याच भावनेला सामाजिक बांधिलकीची जोड देत मुक्ताईनगर येथील अभि पेंट गॅलरीचे संचालक पंकज झनके यांनी यंदाच्या बैलपोळ्यानिमित्त एक अतिशय अनोखा आणि कौतुकास्पद उपक्रम हाती घेतला आहे. ‘बैल तुमचा, कलर आमचा’ या संकल्पनेतून त्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील तब्बल ८८ गावांतील शेतकऱ्यांच्या बैलजोड्यांसाठी सजावटीचा रंग मोफत उपलब्ध करून देण्याची योजना राबवली आहे.
मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौक, जुन्या बसस्थानक मार्गासमोर असलेल्या अभि पेंट गॅलरीमध्ये शेतकरी बांधव आपले बैल घेऊन येत असून, तिथे त्यांच्या बैलांना मोफत रंग लावून सुंदर सजवले जात आहे. विशेष म्हणजे, या सजावटीसाठी लागणारे पेंटरदेखील अभि पेंट गॅलरीच्या माध्यमातून मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या स्तुत्य पुढाकारामुळे पोळ्याच्या सणात बैलांच्या सजावटीवर होणारा शेतकऱ्यांचा आर्थिक खर्च पूर्णपणे टळला असून, त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य केवळ मोफत रंगापुरतेच मर्यादित नाही, तर बैलांसोबत येणाऱ्या प्रत्येक शेतकरी मालकाला सन्मानपूर्वक रुमाल आणि टोपी भेट दिली जात आहे. तसेच सर्जा-राजासाठी पुरणपोळीच्या नैवेद्याची आणि अल्पोपहाराची व्यवस्था करून शेतकरी व त्यांच्या पशुधनाचा यथोचित सन्मान केला जात आहे. त्यामुळे ही संकल्पना एका व्यावसायिक उपक्रमाच्या पलीकडे जाऊन शेतकरी आणि त्याच्या सर्जा-राजाप्रती असलेल्या निस्सीम जिव्हाळ्याचे आणि सामाजिक बांधिलकीचे सुंदर प्रतीक बनली आहे. वर्षभर शेतात अहोरात्र राबणाऱ्या शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सोहळा या उपक्रमामुळे अधिकच खास बनला आहे. तालुक्यातील ८८ गावांमध्ये या उपक्रमाची माहिती पोहोचली असून, अनेक ठिकाणी पेंटर आणि रंगांच्या माध्यमातून बैलांच्या देखण्या सजावटीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शेतकरी बांधवांकडून या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळत असून, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून संचालक पंकज झनके यांच्या या दातृत्वाचे सर्वत्र जोरदार कौतुक होत आहे.



