


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मनपा प्रशासकीय इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. स्थायी समिती सभापती तथा सदस्यांना बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन नगरसचिव मनोज शर्मा यांनी केले आहे. या बैठकीत शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, अग्निशमन व आपत्कालीन सेवा, बालविकास योजना तसेच विविध प्रशासकीय व न्यायप्रविष्ट विषयांवर चर्चा होणार आहे.
बैठकीच्या सुरुवातीला दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेचे कार्यवृत्त कायम करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. त्यानंतर ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजना’ अंतर्गत जळगाव शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक ३ मधील जुना आसोदा रोड परिसरात आ.सी.सी. गटार व स्लॅब कल्व्हर्ट बांधणीच्या कामाचा विषय चर्चेला येणार आहे. या कामासाठी मे. एच. पाटील कन्स्ट्रक्शन यांनी निविदा रकमेतून ०.३३ टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दर्शविली असून, त्यासंदर्भातील प्रशासकीय प्रस्तावावर समिती निर्णय घेणार आहे. जळगाव शहर मनपाअंतर्गत इमारत व पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी नियोजन, डिझाईन तसेच गुणवत्तेची हमी देण्यासाठी वास्तुविशारद व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांची निवड करण्याबाबतचा प्रस्तावही बैठकीत मांडला जाणार आहे. या प्रस्तावाची वैधानिकता तपासून त्याची अंमलबजावणी करण्याबाबत प्रशासनाकडून आलेल्या प्रस्तावावर स्थायी समिती विचार करणार आहे.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजना २०२५-२६ अंतर्गत जळगाव शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक १४ मधील गणपती नगरमध्ये प्लॉट क्रमांक २७ ते ए.एम. पाटील ते गुरुकृपा घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचाही विषय महत्त्वाचा आहे. या कामासाठी कंत्राटदार श्री. विलास प्रभाकर पाटील यांनी निविदा रक्कमेमध्येच दर सादर केल्याने, त्याबाबत प्रशासनाकडून आलेल्या प्रस्तावावर समिती निर्णय घेणार आहे.
जळगाव मनपाअंतर्गत बालवाडीतील बालकांना सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाकरिता एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत पोषण आहार देण्यासंदर्भातील विषयही बैठकीच्या अजेंड्यावर आहे. राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार पोषण आहाराचा दर निश्चित करण्यात आला असून, त्याप्रमाणे या कामासाठी ‘Expression of Interest’ अथवा ई-निविदा सूचना प्रसिद्ध करून मान्यता मिळविण्याबाबत प्रशासनाचा प्रस्ताव समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागासंदर्भातील महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १४९ च्या कलम २८९ अन्वये विभागाकडून दि. १ मे २०२६ ते दि. ३१ मे २०२६ पर्यंतच्या आग-अपघातांच्या आधीच्या अहवालाची माहितीही स्थायी समितीसमोर सादर केली जाणार आहे. यासोबतच जळगाव शहर महानगरपालिकेच्या विविध विषयक न्यायप्रविष्ट प्रकरणांबाबत दि. २७ ऑगस्ट २०२६ ते दि. ५ सप्टेंबर २०२६ या कालावधीतील साप्ताहिक अद्ययावत अहवालाची माहिती समितीला देण्यात येणार आहे.
बैठकीतील आणखी एका महत्त्वाच्या विषयात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ७३(ड) नुसार आयुक्तांनी केलेल्या संविदांची माहिती समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. प्रशासकीय आदेशानुसार मनपाच्या पाणीपुरवठा विभागातील झोन क्रमांक १ मध्ये अत्यावश्यक ठिकाणी पाइपलाईन, क्लॅम्प टाकणे व रोड क्रॉस करणे, आवश्यक साहित्य पुरवणे व बसवणे आदी कामांसाठी कंत्राटदार श्री. संजय दिनेश भोळे, जळगाव यांच्याशी संबंधित प्रस्तावाचा समावेश आहे. अंदाजित रकमेपेक्षा सर्वात कमी दर स्वीकारून एकूण ६ लाख ६२ हजार ०३३ रुपये खर्चाची संविदा करण्यात आल्याची माहिती प्रस्तावात देण्यात आली आहे. या संविदेला स्थायी समितीची मान्यता मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे. एकूणच, जळगाव शहरातील रस्ते व पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, बालविकास, अग्निशमन सेवा आणि विविध प्रशासकीय कामांशी संबंधित विषय या बैठकीत चर्चेला येणार असल्याने स्थायी समितीच्या निर्णयांकडे शहरवासीयांचे लक्ष राहणार आहे. संबंधित विषयांवर चर्चा करून समिती कोणते निर्णय घेते, यावर पुढील कामकाजाची दिशा निश्चित होणार आहे.



