Home क्राईम पाळधी बायपासवर कंटेनर पलटी ; २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी ; २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

0
8


पाळधी-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पाळधी बायपासवरील टाहाकळी फाट्याजवळ बुधवारी भीषण अपघात झाला. रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक कंटेनर पलटी होऊन त्याखाली दुचाकीसह उभा असलेला करण जनार्धन सोनवणे (वय २२) हा तरुण दबला गेला. या दुर्घटनेत करणचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी आक्रोश केला.

मिळालेल्या माहितीनुसार, करण सोनवणे हा दुचाकी घेऊन पाळधी बायपासवरील टाहाकळी फाट्याजवळ आला होता. त्याने मोटारसायकल एका बाजूला लावली होती आणि मोबाईलवर बोलत उभा होता. त्याचवेळी बायपासवरून एक कंटेनर येत असताना अचानक अनियंत्रित होऊन पलटी झाला. पलटी झालेला कंटेनर थेट करणच्या अंगावर कोसळल्याने तो त्याखाली दबला गेला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. करणला बाहेर काढून तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. तरुणाचा मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. दरम्यान, अपघाताच्या ठिकाणी बायपासच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. मात्र, या कामाबाबत वाहनचालकांना पूर्वसूचना देणारे आवश्यक सूचना फलक लावण्यात आले नव्हते, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्यावर सुरू असलेल्या कामाची माहिती वाहनचालकांना उशिरा मिळाल्यामुळे कंटेनर अनियंत्रित होऊन पलटी झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून, रस्ते कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

अपघातानंतर बायपासवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला आणि वाहतूक सुरळीत केली. या दुर्घटनेमुळे रस्त्याच्या दुरुस्तीच्या ठिकाणी वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी योग्य सूचना फलक, दिशादर्शक चिन्हे आणि आवश्यक खबरदारीची उपाययोजना करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. अवघ्या २२ वर्षीय करण सोनवणेचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound