Home Cities जळगाव मयूरेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शाडू मातीच्या गणपती निर्मितीची कार्यशाळा उत्साहात

मयूरेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शाडू मातीच्या गणपती निर्मितीची कार्यशाळा उत्साहात

0
14


रायपूर, ता. जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मयूरेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शाडू मातीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा उत्साहात पार पडली. या उपक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने भक्तिमय वातावरणात स्वहस्ते सुंदर गणेशमूर्ती साकारल्या.

कार्यशाळेदरम्यान श्री गणेश मंत्रांच्या धूनमध्ये विद्यार्थ्यांनी शाडू मातीला आकार देत गणेशमूर्ती तयार करण्याचा आनंद घेतला. पारंपरिक पद्धतीने आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून गणेशमूर्ती घडविण्याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाची जाणीवही निर्माण झाली. यावेळी गजेंद्र परदेशी यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत मार्गदर्शन केले. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (PoP) मूर्तींचे विसर्जन केल्यानंतर नदी, विहीर आणि तलावांच्या परिसंस्थेवर होणाऱ्या संभाव्य दुष्परिणामांची माहिती त्यांनी दिली. त्याऐवजी शाडू मातीच्या मूर्तींचा वापर केल्यास पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होऊ शकते, याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शन भारती परदेशी मॅडम यांनी केले. विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती बनविताना आवश्यक तंत्र, मातीला आकार देण्याची पद्धत आणि मूर्ती अधिक सुबक व आकर्षक कशी बनवावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत विद्यार्थ्यांना मूर्ती घडविण्यासाठी मदत केली.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सोनाली देसले, मयुरी वाघ, शिवानी पाटील आणि चंचल वानखेडे यांनी विशेष परिश्रम घेतले. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत आपल्या कल्पकतेतून विविध सुंदर गणेशमूर्ती साकारल्या. गणेशोत्सव हा आनंद आणि श्रद्धेचा सण असला तरी त्यासोबत पर्यावरणाची जबाबदारीही महत्त्वाची आहे. हीच जाणीव विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा यशस्वी ठरली. शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार करण्याच्या माध्यमातून ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा’ असा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.


Protected Content

Play sound