Home Cities जळगाव सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ; पोलिसांची डीजे-लाऊडस्पीकरच्या आवाजावर नजर

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ; पोलिसांची डीजे-लाऊडस्पीकरच्या आवाजावर नजर

0
3


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यात आगामी काळात विविध सण, उत्सव, मिरवणुका आणि सार्वजनिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे होणार आहेत. या काळात डीजे, लाऊडस्पीकर आणि अन्य ध्वनीवर्धक यंत्रणांचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाने ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी तयारी केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ‘Noise Level Meter’द्वारे आवाजाची पातळी तपासून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

ध्वनी प्रदूषणासंदर्भात न्यायालयाने वेळोवेळी दिलेले निर्देश तसेच Noise Pollution (Regulation and Control) Rules, 2000 मधील तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलीस दलाकडे एकूण ३८ Noise Level Meter (ध्वनी मापक यंत्रे) उपलब्ध असून, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही यंत्रे संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदारांकडे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ध्वनी प्रदूषणाबाबत नागरिकांकडून तक्रार प्राप्त झाल्यास पोलिसांकडून तात्काळ प्रतिसाद देऊन संबंधित ठिकाणी ध्वनीची पातळी तपासली जाणार आहे. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाज आढळल्यास नियमांनुसार संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तक्रारींची हाताळणी पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या सक्षम अधिकाऱ्यामार्फत करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ध्वनी प्रदूषणाच्या नियमांनुसार परिसराच्या वर्गीकरणानुसार आवाजाची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५ डेसीबल आणि रात्री ७० डेसीबल, व्यावसायिक क्षेत्रात दिवसा ६५ आणि रात्री ५५ डेसीबल, रहिवासी क्षेत्रात दिवसा ५५ आणि रात्री ४५ डेसीबल, तर शांतता क्षेत्रात दिवसा ५० आणि रात्री ४० डेसीबल अशी मर्यादा आहे. ध्वनी प्रदूषण (विनियमन व नियंत्रण) नियम, २००० मधील नियम ३(१) व ४(१) नुसार दिवसाची वेळ सकाळी ६ ते रात्री १० आणि रात्रीची वेळ १० ते सकाळी ६ अशी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे सण-उत्सवांच्या काळात ध्वनीवर्धक यंत्रणांचा वापर करताना संबंधितांनी निर्धारित ध्वनीमर्यादा आणि वेळेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

लाऊडस्पीकर किंवा अन्य ध्वनीवर्धक यंत्रणेबाबत पोलीस प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन न करणाऱ्या अथवा आदेशास विरोध करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ७० व १४९ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. कलम १४९ अंतर्गत दोषी आढळल्यास चार महिन्यांपेक्षा कमी नसलेली आणि कमाल एक वर्षापर्यंत कारावासाची तसेच दंडाची शिक्षा होऊ शकते, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना सण-उत्सव आनंदात साजरे करताना ध्वनी प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. डीजे, लाऊडस्पीकर, वाहनांचे हॉर्न, फटाके तसेच अन्य ध्वनी निर्माण करणाऱ्या साधनांचा अनावश्यक आणि मोठ्या आवाजात वापर टाळावा, असे त्यांनी सांगितले.

मोठ्या आवाजामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच प्राणी-पक्ष्यांना त्रास होऊन त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी आवाजाची पातळी नियंत्रित ठेवून इतरांच्या शांततेचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.  आपल्या परिसरात ध्वनी प्रदूषणासंदर्भात नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार करावी. तक्रारीची नियमानुसार दखल घेऊन Noise Level Meter द्वारे आवाजाची तपासणी करण्यात येईल आणि नियमभंग आढळल्यास आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल. ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.


Protected Content

Play sound