Home Cities जळगाव पाच वर्षांचा प्रण पूर्ण ; ९ सप्टेंबरला पंकज महाजन कापणार केस !...

पाच वर्षांचा प्रण पूर्ण ; ९ सप्टेंबरला पंकज महाजन कापणार केस ! नगराध्यक्षपदाचा कारभार स्वीकारताना होणार संकल्पपूर्ती

0
111


नशिराबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राजकारणात दिलेला शब्द पाळण्याची परंपरा अनेकदा पाहायला मिळते; मात्र नशिराबादमध्ये एका अनोख्या संकल्पपूर्तीची चर्चा रंगली आहे. माजी सरपंच तथा विद्यमान नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांनी २०२१ मध्ये घेतलेला केस न कापण्याचा प्रण आता पूर्णत्वास येणार आहे. ९ सप्टेंबर रोजी प्रभारी नगराध्यक्ष म्हणून नगरपरिषदेचा कारभार स्वीकारल्यानंतर ते पाच वर्षांपासून वाढवलेले केस कापणार असून, या निमित्ताने समर्थकांकडून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

“जोपर्यंत नशिराबाद नगरपरिषदेत नगराध्यक्ष म्हणून कारभार पाहत नाही, तोपर्यंत केस कापणार नाही,” असा संकल्प पंकज महाजन यांनी पाच वर्षांपूर्वी केला होता. त्यानंतर त्यांनी आपला शब्द कायम ठेवत केस कापले नाहीत. कालांतराने खांद्यापर्यंत वाढलेले केस हे त्यांच्या या निर्धाराची आणि संकल्पाची वेगळीच ओळख बनले. आता ९ सप्टेंबर रोजी प्रभारी नगराध्यक्ष म्हणून नगरपरिषदेचा कारभार स्वीकारण्याची वेळ आल्याने पाच वर्षांपासून जपलेल्या या संकल्पाची पूर्तता होणार आहे. पदभार स्वीकारल्यानंतर वाढवलेले केस कापून महाजन आपल्या पाच वर्षांच्या प्रणाला पूर्णविराम देणार आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदाचा कारभार स्वीकारण्यासोबतच त्यांच्या राजकीय प्रवासातील एका अनोख्या अध्यायाचीही सांगता होणार आहे.

पंकज महाजन यांच्या खांद्यापर्यंत वाढलेल्या केसांची गेल्या काही वर्षांत नशिराबादच्या राजकीय वर्तुळात विशेष चर्चा होती. विविध सामाजिक, राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या हटके लूककडे अनेकांचे लक्ष वेधले जात होते. मात्र, या केसांमागे केवळ वेगळी स्टाईल किंवा फॅशन नसून पाच वर्षांपूर्वी घेतलेल्या शब्दाची आठवण असल्याचे आता स्पष्ट होत आहे. संकल्पपूर्तीनंतर केस कापण्याचा हा प्रसंगही नशिराबादच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरणार आहे. पाच वर्षे जपलेला शब्द, त्यातून निर्माण झालेली वेगळी ओळख आणि अखेर नगराध्यक्षपदाचा कारभार स्वीकारताना होणारी संकल्पपूर्ती यामुळे ९ सप्टेंबरचा दिवस महाजन यांच्यासाठी विशेष ठरणार आहे.

या संकल्पपूर्तीला कौटुंबिक भावनिक किनारही लाभली आहे. पंकज महाजन यांच्या पत्नी लीना पंकज महाजन या माजी जिल्हा परिषद सदस्य असून सध्या नशिराबाद नगरपरिषदेच्या नगरसेविका आहेत. पंकज महाजन यांनी घेतलेल्या पाच वर्षांच्या प्रणाच्या संपूर्ण प्रवासाच्या त्या साक्षीदार राहिल्या आहेत. पाच वर्षे जपलेल्या संकल्पानंतर कापले जाणारे केसांचे ‘जाऊळ’ पत्नी लीना महाजन झेलणार आहेत. त्यामुळे हा क्षण महाजन कुटुंबासाठी भावनिक आणि संस्मरणीय ठरणार आहे. पतीच्या निर्धाराला पाच वर्षे मिळालेली साथ आणि अखेर त्या शब्दाची झालेली पूर्तता यामुळे या प्रसंगाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, पंकज महाजन यांच्या प्रभारी नगराध्यक्षपदाच्या पदभाराच्या निमित्ताने समर्थकांकडून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. नगरपरिषद कार्यालयापासून खालची आळी येथील विठ्ठल मंदिरापर्यंत ही रॅली काढण्यात येणार आहे. रॅलीत मोठ्या संख्येने समर्थक सहभागी होण्याची शक्यता असल्याने ९ सप्टेंबर रोजी नशिराबादमध्ये राजकीय वातावरणात उत्साहाचे चित्र पाहायला मिळणार आहे. माजी सरपंच म्हणून केलेले काम, त्यानंतर नगरपरिषदेच्या राजकारणातील सक्रिय वाटचाल आणि आता प्रभारी नगराध्यक्षपदाची मिळालेली जबाबदारी, या पार्श्वभूमीवर पंकज महाजन यांच्यासाठी हा दिवस राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम, समर्थकांची रॅली आणि पाच वर्षांच्या प्रणाची संकल्पपूर्ती असे तिहेरी आकर्षण ९ सप्टेंबरला नशिराबादमध्ये पाहायला मिळणार आहे.


Protected Content

Play sound