Home क्राईम एमआयडीसीतील बॅटरी कंपनीत चोरी करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात; ६ आरोपी अटकेत

एमआयडीसीतील बॅटरी कंपनीत चोरी करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात; ६ आरोपी अटकेत

0
10


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एम.आय.डी.सी. परिसरातील ई-सेक्टरमधील श्री आनंद बॅटरी कंपनीत झालेल्या चोरीचा छडा लावण्यात एम.आय.डी.सी. पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तांबापुरा परिसरातील सहा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३९० किलो वजनाच्या शिशाच्या १६ धातूच्या विटा आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण १ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कंवर नगर येथील रहिवासी लखन वासुदेव बुधानी यांच्या मालकीची श्री आनंद बॅटरी कंपनी एम.आय.डी.सी. ई-सेक्टरमध्ये आहे. ३१ ऑगस्टच्या रात्री ९ वाजेपासून १ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या सिमेंट कंपाऊंडची जाळी तोडून आत प्रवेश केला. कंपनीत ठेवलेल्या सुमारे १ लाख २५ हजार रुपये किमतीच्या ५०० किलो वजनाच्या शिशाच्या २० धातूच्या विटा चोरून नेण्यात आल्या होत्या. याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तपास सुरू केला. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुंडलीक धनके यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक तपासासोबतच गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तांबापुरा परिसरात कारवाई करत सहा जणांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी आसिफ शहा सिकंदर शहा, मोहसीन शाह सिकंदर शाह, महेश उर्फ बापु संतोष भोई, मुकेश राजु परमार, शेख आबिद शेख मोहम्मद आणि शकील शहा रुबाब शहा यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ९७ हजार ५०० रुपये किमतीच्या शिशाच्या १६ धातूच्या विटा, ज्यांचे एकूण वजन ३९० किलो आहे, तसेच ३० हजार रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली.

या कारवाईत पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, गिरीश पाटील, प्रमोद लाडवंजारी, रामकृष्ण पाटील, किरण चौधरी, मोतीलाल बोरसे, शशिकांत मराठे आणि रमाकांत साळुंखे यांच्या पथकाने सहभाग घेतला.

श्री आनंद बॅटरी कंपनीतील चोरीचा तपास करताना पोलिसांनी अवघ्या काही कालावधीत सहा संशयितांना जेरबंद करून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केल्याने या कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे. पुढील तपास एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या पथकाकडून सुरू आहे.


Protected Content

Play sound