Home क्राईम एमआयडीसीतील इलेक्ट्रिक दुकान फोडणाऱ्या तिघांना अटक; हजारोंचा मुद्देमाल जप्त

एमआयडीसीतील इलेक्ट्रिक दुकान फोडणाऱ्या तिघांना अटक; हजारोंचा मुद्देमाल जप्त

0
8


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढोर बाजार परिसरातील इलेक्ट्रिक दुकानात झालेल्या घरफोडीचा पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणी तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ढोर बाजार परिसरातील ‘मातोश्री’ इलेक्ट्रिक दुकानाचे शटर वाकवून तसेच कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ४० किलो तांब्याची नवीन व जुनी तार तसेच रिपेअरिंग साहित्य चोरून नेले होते. ३ सप्टेंबरच्या रात्री ते ४ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेच्या दरम्यान ही घटना घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. घटनास्थळाची पाहणी, सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी हर्षल गोपाल परदेशी (२२, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव), कमलेश सुरेश पवार (२१, रा. कुसुंबा, ता. जळगाव) आणि रितेश निवृत्ती साळुंखे (२१, रा. कुसुंबा, ता. जळगाव) यांना ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपींनी दुकानात चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्या ताब्यातून ६० हजार रुपये किमतीची ४० किलो तांब्याची नवीन व जुनी तार तसेच गुन्ह्यात वापरलेली ३० हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.

एमआयडीसी परिसरातील घरफोडीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आणत पोलिसांनी तीन आरोपींना अटक करून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.


Protected Content

Play sound