


पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ईको वाहनांच्या सायलेंसरमधील प्लॅटिनम, पॅलेडियम आणि रोडियमसारखे मौल्यवान धातू चोरण्याच्या तयारीत असलेल्या उत्तर प्रदेशातील दोन संशयितांना पारोळा पोलिसांनी अटक केली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर म्हसवे गावाजवळ केलेल्या नाकाबंदीत ही कारवाई करण्यात आली. संशयितांकडून कार, तीन ईको सायलेंसर, मौल्यवान धातू असलेल्या १० कॅरीबॅग आणि चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण ६ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी विशेष पथक तयार करून महामार्गावर नाकाबंदी केली. यावेळी निळ्या रंगाची मारुती वॅगनआर (क्रमांक DL-3-CBU-3358) संशयावरून थांबवून तपासणी करण्यात आली.
कारमध्ये यासिफ यामीन चौधरी (वय २२, रा. गाझियाबाद, उत्तर प्रदेश) आणि आरीफ सलीम (वय २३, रा. अलिगड, उत्तर प्रदेश) हे दोघे आढळून आले. वाहनाची झडती घेतली असता सायलेंसर काढण्यासाठी वापरण्यात येणारी लोखंडी टॉमी, हातोडा, रिंच सेट तसेच ईको वाहनांचे तीन सायलेंसर मिळून आले.
तपासणीदरम्यान १० पांढऱ्या कॅरीबॅगमध्ये सायलेंसरमधील प्लॅटिनम, पॅलेडियम आणि रोडियम हे मौल्यवान धातूही आढळले. रात्रीच्या वेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांचे सायलेंसर चोरून त्यातील मौल्यवान धातू काढण्याचे नियोजन असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जप्त मुद्देमालामध्ये सुमारे ४ लाख रुपये किमतीची मारुती वॅगनआर, १ लाख ५० हजार रुपयांचे मौल्यवान धातू असलेल्या कॅरीबॅग, ७५ हजार रुपये किमतीचे तीन ईको सायलेंसर आणि १० हजार रुपयांचा इनफिनिक्स मोबाईल यांचा समावेश आहे.
पोलीस कॉन्स्टेबल आकाश पाटील यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक पिंपळे पुढील तपास करीत आहेत.
पारोळा पोलिसांच्या या कारवाईमुळे ईको वाहनांचे सायलेंसर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून, या संशयितांचा यापूर्वीच्या अशाच घटनांशी काही संबंध आहे का, याचा तपासही पोलीस करीत आहेत.



