


नशिराबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद येथील आठवडे बाजार परिसरात आयोजित दहीहंडी स्पर्धेत गोविंदा पथकांनी उत्साह आणि थराराची अनुभूती दिली. चैतन्य मित्र मंडळ व जनता मित्र मंडळाच्या वतीने आयोजित या दहीहंडी सोहळ्यात भवानीनगर मित्र मंडळाच्या गोविंदा पथकाने दहीहंडी फोडण्याचा मान मिळवत विजेतेपद पटकावले.
उंचावर बांधण्यात आलेली दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकाने मानवी मनोरे रचत प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अखेर भवानीनगर मित्र मंडळाच्या पथकातील दीपक कोळी या गोविंदाने दहीहंडी फोडताच उपस्थित नागरिकांनी एकच जल्लोष केला. ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्साहपूर्ण वातावरणात परिसर दुमदुमून गेला.
या स्पर्धेत विजेत्या भवानीनगर मित्र मंडळाच्या गोविंदा पथकाला ११ हजार रुपये रोख, चांदीची अंगठी आणि ड्रेस अशी आकर्षक बक्षिसे देण्यात आली. नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्या हस्ते विजेत्या पथकाला बक्षीस वितरण करण्यात आले. दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी नशिराबादसह परिसरातील नागरिकांनी आठवडे बाजार परिसरात मोठी गर्दी केली होती. गोविंदा पथकांच्या उत्साहाला उपस्थितांनी टाळ्या आणि घोषणांच्या माध्यमातून दाद दिली. त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्सवाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. चैतन्य मित्र मंडळ आणि जनता मित्र मंडळाच्या पुढाकाराने झालेल्या या दहीहंडी स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भवानीनगर मंडळाने दहीहंडी फोडताच या स्पर्धेची सांगता जल्लोषात झाली.



