


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिल्ली येथे महिला पत्रकार नफीसा खान आणि शाहीन खान यांच्याशी पोलिसांनी कथित मारहाण केल्याच्या तसेच त्यांच्या धार्मिक ओळखीबाबत कथित विचारणा केल्याच्या प्रकरणाच्या निषेधार्थ एकता संघटनेच्या वतीने जळगावातील शिवछत्रपती महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. या प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी संघटनेने केली.
या प्रकरणाबाबत संघटनेने भारताच्या राष्ट्रपती, केंद्रीय गृहमंत्री, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग तसेच प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाकडे दखल घेण्याची मागणी केली आहे. पत्रकारांवरील कथित मारहाण आणि त्यांच्या धार्मिक ओळखीबाबत झालेल्या कथित चौकशीमुळे पत्रकारितेचे स्वातंत्र्य, नागरिकांचे घटनात्मक अधिकार आणि लोकशाही व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याचे संघटनेने म्हटले. एकता संघटनेचे मजहर खान यांनी सांगितले की, पत्रकारांनी केलेले आरोप चौकशीत खरे ठरल्यास आणि धार्मिक ओळखीच्या आधारावर त्यांच्याशी गैरवर्तन किंवा मारहाण झाल्याचे निष्पन्न झाल्यास हा केवळ पोलिस कारवाईचा विषय राहणार नाही, तर संविधानातील समानता आणि न्यायाच्या तत्त्वांबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतील.
हाफिज रहीम पटेल यांनी लोकशाहीमध्ये पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. सत्तेला प्रश्न विचारणे आणि जनतेसमोर वस्तुस्थिती मांडणे हे पत्रकारितेचे काम आहे. प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना दबावाखाली आणले गेले तर लोकशाहीची मूल्ये कमकुवत होतील, अशी भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान, पोलिसांकडून व्हीव्हीआयपी मार्गात कथित अडथळा निर्माण झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोन्ही बाजूंचे दावे स्वतंत्र पुराव्यांच्या आधारे तपासले जावेत, अशी मागणी संघटनेने केली. घटनास्थळावरील तसेच संबंधित पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवावे, पत्रकारांच्या मोबाईलमधील व्हिडिओ व इतर उपलब्ध पुराव्यांची तपासणी करावी आणि दोन्ही महिला पत्रकारांची स्वतंत्र व निष्पक्ष वैद्यकीय तपासणी करावी, अशी मागणी मुफ्ती खालिद यांनी केली.
एकता संघटनेचे फारूक शेख यांनी संविधान प्रत्येक नागरिकाला समानता, सन्मान आणि न्यायाचा अधिकार देत असल्याचे सांगितले. व्यक्तीचा धर्म, लिंग किंवा पत्रकार म्हणून असलेली भूमिका यावरून भेदभाव होता कामा नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच, स्वतंत्र चौकशी पूर्ण होण्यापूर्वी कोणालाही दोषी ठरविण्याची संघटनेची भूमिका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र चौकशीत कोणत्याही पोलिस कर्मचाऱ्याची भूमिका कायद्याच्या विरोधात आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर आणि विभागीय कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवावा आणि स्वतंत्र चौकशी सुनिश्चित करावी, अशी मागणीही करण्यात आली. नाझिया शेख यांनी या प्रकरणाला केवळ दोन पत्रकारांचा प्रश्न न मानता पत्रकारितेचे स्वातंत्र्य आणि नागरिकांच्या समान वागणुकीशी संबंधित मुद्दा असल्याचे सांगितले.
सलीम इनामदार यांनी आरोप चौकशीत सत्य ठरल्यास संबंधितांवर कोणत्याही राजकीय किंवा प्रशासकीय दबावाशिवाय कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. तर मतीन पटेल यांनी “लोकशाहीमध्ये सत्तेला प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही, पत्रकारिता करणे गुन्हा नाही आणि धार्मिक ओळख असणेही गुन्हा नाही,” अशी भूमिका मांडली. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नसल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकरणी निष्पक्ष आणि पारदर्शक कारवाई झाली नाही, तर संबंधित संवैधानिक संस्था, वैधानिक आयोग आणि सक्षम न्यायालयासमोर कायदेशीर मार्गाने पुढील भूमिका घेण्यात येईल, असा इशारा अनिस शाह यांनी दिला. आंदोलनादरम्यान “दिल्ली पोलिस हाय-हाय”, “दिल्ली पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे”, “महिलांना संरक्षण मिळाले पाहिजे” आणि “सच्ची पत्रकारिता जिंदाबाद” अशा घोषणा देण्यात आल्या. या घोषणांमुळे शिवछत्रपती महाराज चौक परिसर दणाणून गेला.
मुफ्ती खालिद यांच्या मार्गदर्शनाखाली आणि फारूक शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आयोजित करण्यात आले. यावेळी नाझिया शेख, तकदीस शेख, मीहीरीन शेख, आलिया शेख, तोहरा सादिक, सकीना इस्माईल, रिबीन हरीश, समीन नईम, शाहीन रईस यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या. तसेच हाफिज रहीम पटेल, अॅड. आवेश शेख, अनिस शाह, नजमोद्दीन शेख, सलीम इनामदार, मतीन पटेल, मजहर खान, अनवर सिकलगार, आरिफ देशमुख, रज्जाक पटेल, सईद शेख, रऊफ रहीम, मौलाना शफिक पटेल, मुजाहिद खान, अख्तर शेख, रहीम जाकीर शेख, गुफरान मौलाना, ओझर देशमुख, महमूद शेख, दानियाल शेख, अब्दुल रऊफ पटेल, अमीन शेख, अमीर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.



