
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील स्टेडियम कॉम्प्लेक्ससमोरील दुकानांच्या विनापरवाना अथवा अनधिकृत बांधकामाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. जळगाव शहर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने संबंधित बांधकामप्रकरणी कैलास पितांबर पवार आणि संजय पितांबर पवार यांना नोटीस बजावली असून, आवश्यक परवानग्या व कागदपत्रांसह खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

मनपाच्या नोटिशीनुसार, जळगाव नगररचना योजना क्रमांक २ मधील अ.भू.क्र. २१७ येथील मिळकतीवर तळमजला तसेच पहिल्या मजल्यावरील दुकानांचे विनापरवाना किंवा अनधिकृत बांधकाम झाल्याचे मनपाच्या निदर्शनास आले आहे. सदर बांधकामासाठी महानगरपालिकेकडून आवश्यक परवानगी घेण्यात आली आहे किंवा नाही, याबाबत मनपाने आक्षेप नोंदविला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधितांना बांधकामासंदर्भात लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच बांधकामाशी संबंधित मंजुरी, परवानगी आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह महानगरपालिकेच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. यासाठी संबंधितांना ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
मनपाने नोटिशीत स्पष्ट केले आहे की, निर्धारित मुदतीत समाधानकारक खुलासा सादर करण्यात आला नाही किंवा बांधकामाबाबत आवश्यक कागदपत्रे व परवानग्या दाखवण्यात आल्या नाहीत, तर संबंधित बांधकामाविरोधात नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. तसेच अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई करण्यात आल्यास त्यासाठी होणारा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाऊ शकतो. स्वतःच्या खर्चाने अनधिकृत बांधकाम हटविण्याची वेळ आल्यास त्याची जबाबदारी संबंधितांवरच राहील, असा इशाराही नोटिशीत देण्यात आला आहे.
मनपाच्या नोटिशीत नमूद केलेल्या वर्णनानुसार, तळमजला आणि पहिल्या मजल्यावरील दुकानांच्या बांधकामाचा आकार सुमारे ९.९० मीटर × ५.३० मीटर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या परवानग्यांची पूर्तता करण्यात आली आहे की नाही, याची पडताळणी आता संबंधित कागदपत्रांच्या आधारे होणार आहे. महानगरपालिकेच्या या नोटिशीमुळे स्टेडियम कॉम्प्लेक्स परिसरातील संबंधित बांधकामाचा विषय चर्चेत आला असून, ३० दिवसांच्या मुदतीत संबंधितांकडून काय खुलासा सादर केला जातो आणि त्यानंतर मनपा प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.



