
बोदवड-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बोदवड शहर व तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त होत असून, वाढत्या चोरीच्या घटना आणि विविध गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर अनुभवी पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर यापूर्वी बोदवड पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावलेले पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांची पुन्हा बोदवड पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शहरात दुकाने फोडणे, केबल चोरी, जनावरे चोरी तसेच ठिबक सिंचन साहित्य चोरीच्या घटनांबाबत चिंता वाढली आहे. यासोबतच बँक, बसस्थानक आणि बाजारपेठ परिसरात पाकीटमारीसारख्या घटनांबाबतही नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचे सांगण्यात येत आहे. ग्रामीण भागातही चोरीच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण आवश्यक असल्याची मागणी होत आहे. महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. छेडछाड, मुली बेपत्ता होणे, अपहरण अथवा घरातून निघून जाण्याच्या घटनांबाबत अधिक प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. शहरातील रोडरोमिओंवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित गस्त आणि कठोर प्रतिबंधात्मक कारवाईची मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.
वाहनचालकांकडून वेगमर्यादेचे उल्लंघन होत असल्याने अपघातांचा धोका वाढत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक दक्षता घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या कार्यरत अधिकारी व कर्मचारी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करत असले तरी, गुन्हेगारी घटनांवर अधिक प्रभावी नियंत्रणाची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गायकवाड यांच्या यापूर्वीच्या बोदवडमधील कार्यकाळाची आठवण नागरिकांकडून करून दिली जात आहे. त्यांच्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच विविध सण-उत्सवांच्या काळात जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यांच्या कार्यकाळात चोरीच्या घटनांवर नियंत्रण आले होते आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती, असा दावा करण्यात येत आहे.
पोलीस ठाण्याच्या कामकाजात सुधारणा करून नागरिकांशी समन्वय वाढविण्याचे कामही त्यांच्या कार्यकाळात झाल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती हाताळण्यासाठी अनुभवी आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करत राहुल गायकवाड यांची पुन्हा बोदवड पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, ‘सिंघम फेम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल गायकवाड यांच्या पूर्वीच्या कार्यपद्धतीचा दाखला देत नागरिकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे ही मागणी मांडली आहे. शहर व तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.



