



यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील रहिवासी, गृहिणी तसेच ‘श्रद्धा ब्युटी पार्लर’च्या संचालिका सोनाली विवेकानंद तायडे यांच्या सौंदर्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र बिझनेस अँड ब्युटी अवॉर्ड’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २१ जुलै २०२६ रोजी चाळीसगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय अवॉर्ड शोमध्ये त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दक्षित डॉल्फिन डिझाईनर कंपनीच्या वतीने चाळीसगाव येथे या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातील अनेक ब्युटी एक्स्पर्ट्स आणि ब्युटी पार्लर संचालिकांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. सौंदर्य क्षेत्रात उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ब्युटी पार्लर संचालिकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. याच सोहळ्यात यावलच्या सौ. सोनाली तायडे यांना त्यांच्या व्यवसायातील कामगिरी आणि सौंदर्य क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘महाराष्ट्र बिझनेस अँड ब्युटी अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. पुरस्कार सोहळ्याला डॉल्फिन डिझाईनर कंपनीचे सीईओ नितीश शिवहरे, एमडी प्रियंका साहू आणि रश्मी लोढाया यांची विशेष उपस्थिती होती.
गृहिणी म्हणून कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत सौंदर्य व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सौ. सोनाली तायडे यांच्या कार्याचे या पुरस्कारामुळे विशेष कौतुक होत आहे. त्यांच्या मेहनतीची आणि कार्यातील सातत्याची दखल राज्यस्तरीय पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आल्याने यावल शहरासाठीही ही अभिमानाची बाब मानली जात आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना सौ. सोनाली विवेकानंद तायडे यांनी सांगितले की, या कार्यक्रमामुळे आणि मिळालेल्या सन्मानामुळे आपल्या कार्यात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली आहे. या पुरस्कारामुळे कामाप्रती अधिक उत्साह मिळणार असून, भविष्यात आणखी चांगले काम करण्यासाठी हा सन्मान प्रेरणादायी ठरेल, असे त्यांनी सांगितले. सौ. सोनाली तायडे यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल यावल शहरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे. सौंदर्य व्यवसायात कार्यरत असलेल्या महिलांसाठी त्यांचा हा प्रवास प्रेरणादायी ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.



