Home प्रशासन नगरपालिका यावल नगरपरिषदेला STP प्रकल्पासाठी १.९६ हेक्टर जमीन मंजूर ; आमदार अमोल जावळेंच्या...

यावल नगरपरिषदेला STP प्रकल्पासाठी १.९६ हेक्टर जमीन मंजूर ; आमदार अमोल जावळेंच्या पाठपुराव्याला यश

0
9


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. शहरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) उभारण्यासाठी यावल नगरपरिषदेला गट क्रमांक १२३३ मधील एकूण ९.२८ हेक्टर क्षेत्रापैकी १.९६ हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी, जळगाव यांनी दिले आहेत. त्यामुळे शहरातील सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने मोठी प्रगती झाली आहे.

नगरोत्थान महाअभियान आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.० अंतर्गत या जमिनीचा वापर करण्यात येणार आहे. त्यापैकी १.२५ हेक्टर जमीन सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी, तर ०.७१ हेक्टर जमीन जलशुद्धीकरण केंद्रासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशा प्रकारे एकूण १.९६ हेक्टर जमीन यावल नगरपरिषदेला प्राप्त झाली आहे. या जागेवर मलजल प्रक्रिया केंद्र (STP), त्यासंबंधित आवश्यक संरचना, मलजल वाहिनीचे जाळे तसेच नाल्यांमध्ये येणारे सांडपाणी अडवून त्याला प्रक्रिया केंद्राकडे वळविण्यासाठी ‘Interception & Diversion’ची कामे करण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे शहरातील सांडपाण्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट आणि प्रक्रिया करणे शक्य होणार आहे.

सध्या शहरातील सांडपाणी नद्या आणि जलस्रोतांमध्ये मिसळण्यामुळे जलप्रदूषणाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर सांडपाण्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करता येणार असल्याने जलप्रदूषण रोखण्यास मोठी मदत होणार आहे. यासोबतच शहरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यास आणि नागरिकांना अधिक स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देण्यास हातभार लागणार आहे. यावल शहरातील भुयारी गटार योजनेसाठी यापूर्वीच १२५ कोटी रुपयांची तांत्रिक मान्यता प्राप्त झाली आहे. या योजनेतील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे काम स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.० अंतर्गत प्रथम टप्प्यात करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन उपलब्ध होणे हा योजनेच्या अंमलबजावणीतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध व्हावी यासाठी रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. संबंधित विभागांकडे पाठपुरावा करून प्रकल्पासाठी आवश्यक असलेली जमीन उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात आली. अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे. यावल शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर आधुनिक सांडपाणी व्यवस्थापनाची आवश्यकता होती. भुयारी गटार योजना आणि त्यासोबत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारला गेल्यास शहरातील स्वच्छता व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. तसेच सांडपाणी थेट नदी किंवा अन्य जलस्रोतांमध्ये मिसळण्याचे प्रमाण कमी होऊन पर्यावरण संवर्धनास मदत होईल.


Protected Content

Play sound