Home Cities यावल रावेर-यावलमध्ये लंपी रोगाचा प्रादुर्भाव ; तातडीने लसीकरण करा – आमदार अमोल जावळे...

रावेर-यावलमध्ये लंपी रोगाचा प्रादुर्भाव ; तातडीने लसीकरण करा – आमदार अमोल जावळे यांच्या जिल्हा प्रशासनाला कडक सूचना

0
34


यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर आणि यावल तालुक्यातील विविध गावांमध्ये पशुधनावर लंपी स्किन डिसिज (Lumpy Skin Disease) या अत्यंत संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वेगाने वाढताना दिसून येत आहे. या लंपीच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण परिसरातील पशुपालक आणि शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत सापडला आहे. या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेत आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी जिल्हा पशुसंवर्धन विभागाला संपूर्ण यंत्रणा अलर्टवर ठेवून तातडीने कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि लसीकरण मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहेत.

आमदार जावळे यांनी दिलेल्या सूचनांनुसार, रावेर व यावल तालुक्यातील बाधित तसेच संभाव्य धोक्याच्या छायेत असलेल्या गावांमध्ये तातडीने विशेष पशुवैद्यकीय पथके पाठवून जनावरांची कसून तपासणी केली जावी. संसर्ग झालेल्या बाधित जनावरांचे तातडीने विलगीकरण करून त्यांच्यावर योग्य ते वैद्यकीय औषधोपचार करण्यात यावेत. या रोगाचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी विशेष लसीकरण मोहीम राबवून सर्व भागात पुरेशा प्रमाणात लस, आवश्यक औषध साठा आणि पशुवैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. तसेच रोगाचा प्रसार रोखण्यासाठी पशुपालकांमध्ये जनजागृती करून जनावरांची काळजी, विलगीकरण व इतर प्रतिबंधात्मक उपायांबाबत नियमित मार्गदर्शन करण्याचेही त्यांनी सुचवले आहे.

प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ अंतर्गत आवश्यक त्या सर्व कायदेशीर व तांत्रिक प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवण्यात याव्यात. या रोगाचा प्रसार इतर निरोगी गावांमध्ये किंवा शेजारील जिल्ह्यांमध्ये होणार नाही, यादृष्टीने अतिशय प्रभावी नियोजन करावे, असा इशाराही आमदार जावळे यांनी दिला आहे. याशिवाय, लंपी रोगामुळे बाधित झालेल्या अथवा ज्या पशुपालकांचे पशुधन मृत पावले आहे, त्यांना शासनाच्या प्रचलित नियमांनुसार आवश्यक ती मदत तातडीने मिळावी म्हणून प्रशासनाने जलद गतीने कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.


Protected Content

Play sound