



अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत निशांत रंधे यांच्या नेतृत्वाखालील लोकमान्य पॅनलने एकतर्फी विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. बँकेच्या २१ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत लोकमान्य पॅनलने सर्वच्या सर्व २१ जागा जिंकत विरोधकांना मोठा धक्का दिला. या निकालामुळे बँकेवरील निशांत रंधे यांच्या नेतृत्वावर सभासदांनी पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केल्याचे स्पष्ट झाले आहे.
या निवडणुकीतील २१ पैकी पाच जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. यामध्ये संदीप येळवंडे, लक्ष्मण देसले, शशांक विश्वासराव रंधे, शंकर वसावे आणि योगेश धात्रक यांचा समावेश होता. उर्वरित १६ जागांसाठी मतदान झाले. सोमवारी निकाल जाहीर झाल्यानंतर लोकमान्य पॅनलच्या सर्व उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत पॅनलची ताकद सिद्ध केली. सर्वसाधारण धुळे-नंदुरबार जिल्हा गटात प्रशांत बोरसे यांनी २ हजार ८०८ मते मिळवत सर्वाधिक मते मिळवली. प्रवीण भदाणे यांना २ हजार ८०६, बिपिनचंद्र सोनवणे यांना २ हजार ७६३, विजयकुमार माळी आणि अमोल शिंदे यांना प्रत्येकी २ हजार ७४७, बापूराव पाटील यांना २ हजार ७४१, मयूर पवार यांना २ हजार ७३३, प्रकाश बच्छाव यांना २ हजार ७२३, देवेंद्र बोरसे यांना २ हजार ७२१, दीपक अहिरे यांना २ हजार ७२३, दीपक निकम यांना २ हजार ७१८, आनंदराव करनकाळ यांना २ हजार ७११ आणि वैभव सोनवणे यांना २ हजार ७०९ मते मिळाली. सर्वसाधारण जळगाव जिल्हा गटातून भूपेंद्र बाविस्कर यांनी ३ हजार १४६ मते मिळवत विजय मिळवला. महिला राखीव गटात सोनाली अविनाश भामरे यांनी ३ हजार ५२ मते मिळवली, तर कविता दिगंबर मोरे यांनी २ हजार ९१५ मते मिळवत विजय नोंदविला.
निकाल जाहीर होताच नवनिर्वाचित संचालक आणि समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विजयानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत तसेच फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला. या विजयामुळे लोकमान्य पॅनलच्या समर्थकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. गेल्या निवडणुकीत निशांत रंधे यांच्या पॅनलने २१ पैकी १३ जागांवर विजय मिळवत बँकेची सत्ता काबीज केली होती. गेल्या दहा वर्षांपासून बँकेची धुरा सांभाळणाऱ्या निशांत रंधे यांच्या नेतृत्वावर यंदाच्या निवडणुकीत सभासदांनी पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे. मागील निवडणुकीतील १३ जागांच्या तुलनेत यंदा २१ पैकी २१ जागांवर विजय मिळवत लोकमान्य पॅनलने आपले वर्चस्व आणखी मजबूत केले आहे.
निवडणूक प्रक्रिया मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा शिरपूरचे सहाय्यक निबंधक राजेंद्र विरकर यांच्या देखरेखीखाली पार पडली. त्यांच्या सहकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सहकार्य केले. दरम्यान, लोकमान्य पॅनलच्या सर्व विजयी उमेदवारांचे पाडळसरे, ता. अमळनेर येथील सरपंच शुभांगी सचिन पाटील तसेच माजी सरपंच सचिन योगराज पाटील यांनी अभिनंदन केले. या दणदणीत विजयामुळे धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बँकेत लोकमान्य पॅनलचे वर्चस्व अधिक भक्कम झाले आहे.



