



फैजपूर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील जे. टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु. धनश्री वाघमारे हिने ‘अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२६‘ च्या जिल्हास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून भव्य यश संपादन केले आहे. या उत्तुंग यशामुळे तिची नाशिक विभागीय विज्ञान मेळावा स्पर्धेसाठी निवड झाली असून, जे. टी. महाजन स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
महाराष्ट्र शासन राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली १ सप्टेंबर रोजी गुरुकुलम ग्लोबल स्कूल, जळगाव येथे या जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या मेळाव्यासाठी “भारतीय ऊर्जा क्षेत्र २०४७ : भवितव्य (संधी) आणि आव्हाने” हा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय ठेवण्यात आला होता. या विषयावर धनश्रीने अत्यंत प्रभावी, आत्मविश्वासपूर्ण मांडणी, तर्कशुद्ध विचार आणि उत्कृष्ट सादरीकरणाच्या बळावर परीक्षकांची मने जिंकली. १५ तालुक्यांतील तब्बल २८ निवडक विद्यार्थ्यांमधून तिने द्वितीय क्रमांक पटकावत आपले शैक्षणिक व वैज्ञानिक कौशल्य सिद्ध केले. यापूर्वी तिने तालुकास्तरीय स्पर्धेतही प्रथम क्रमांक मिळवला होता.
धनश्रीच्या या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक मोझेस जाधव यांचे निरंतर प्रोत्साहन, तसेच विज्ञान शिक्षिका सौ. मनीषा ढाके व शिक्षक अनिकेत पाटील यांचे मोलाचे व परिश्रमपूर्वक मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, नवोपक्रमशीलता आणि संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचे हे फळ मानले जात आहे. तिच्या या यशाबद्दल तापी परिसर विद्या प्रसारक मंडळाचे (TME Society) अध्यक्ष शरद महाजन, उपाध्यक्ष उल्हास निंबा चौधरी, सचिव विजय रघुनाथ झोपे, मानद सहसचिव शशिकांत रामचंद्र चौधरी, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक मोझेस जाधव, पर्यवेक्षिका सौ. पूनम नेहेते, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन करून आगामी विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



