Home Cities जळगाव जळगावात मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा! निकृष्ट रस्त्याच्या कामावरून सत्ताधारी नगरसेवकांचा ठिय्या; काम पाडले...

जळगावात मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा! निकृष्ट रस्त्याच्या कामावरून सत्ताधारी नगरसेवकांचा ठिय्या; काम पाडले बंद

0
101


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई-नागपूर महामार्गाच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मानराज पार्क चौफुलीवर मध्यरात्री सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाच्या दर्जावर आक्षेप घेत सत्ताधारी नगरसेवकांनी थेट घटनास्थळी धाव घेत काम बंद पाडले. अत्यंत वर्दळीच्या चौकात पर्यायी वाहतूक व्यवस्था न करता काम सुरू केल्याचा तसेच निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप करत नगरसेवकांनी ठिय्या मांडल्याने मध्यरात्री काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मानराज पार्क चौफुलीवर रस्त्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी नगरसेवकांना फोन करून घटनास्थळी बोलावले. त्यानंतर भाजपचे नगरसेवक अमर जैन तसेच शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक नरेंद्र पाटील यांच्यासह संबंधित पदाधिकारी घटनास्थळी पोहोचले. रस्त्याचे काम सुरू असताना वाहतुकीसाठी योग्य पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आलेला नसल्याचा आक्षेप यावेळी घेण्यात आला. कामाच्या गुणवत्तेबाबतही नगरसेवकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. महामार्गावरील हा भाग अत्यंत वर्दळीचा असून रात्रीच्या वेळीही मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. अशा परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून कामाचे नियोजन करणे आवश्यक असताना घाईघाईने आणि निकृष्ट पद्धतीने काम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. नगरसेवकांनी काम थांबवत घटनास्थळीच ठिय्या मांडल्याने परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच जळगाव महापालिकेचे उपमहापौर मनोज चौधरी घटनास्थळी दाखल झाले. नागरिक आणि नगरसेवक आक्रमक असल्याचे पाहून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी तसेच संबंधित ठेकेदारांनाही तातडीने घटनास्थळी बोलावण्यात आले.

यावेळी उपमहापौर मनोज चौधरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. रस्त्याच्या कामाबाबत यापूर्वीही तक्रारी करण्यात आल्या होत्या, मग इतके दिवस प्रशासनाने काय केले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “नागरिकांचे जीव जात आहेत, तुम्हाला आणखी किती बळी हवेत?” अशा संतप्त शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत नगरसेवक आणि नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर ठेकेदाराकडून स्पष्टीकरण देण्यात आले. कामाच्या गुणवत्तेबाबत नागरिक आणि नगरसेवकांचे समाधान करण्याचे आश्वासन ठेकेदाराने दिल्यानंतर परिस्थिती काही प्रमाणात निवळली. मात्र रस्त्याचे काम आणि त्याची गुणवत्ता यावरून निर्माण झालेला प्रश्न अद्याप कायम आहे.

दरम्यान, या संपूर्ण रस्ते कामाबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे ठरविण्यात आले आहे. या बैठकीत महामार्गावरील कामाचा दर्जा, वाहतुकीचे नियोजन, पर्यायी मार्ग आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावर यापूर्वीही अपघात आणि वाहतूक कोंडीचे प्रश्न समोर आले आहेत. त्यामुळे मोठ्या रस्ते कामांपूर्वी पर्यायी वाहतूक मार्ग, सुरक्षा उपाययोजना आणि कामाच्या गुणवत्तेची काटेकोर तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


Protected Content

Play sound