Home पर्यावरण सुबाभळीच्या वाढत्या झाडांमुळे कपाशीचे नुकसान; पाचोऱ्यात शेतकरी हवालदिल, न्यायालयीन लढाईचा निर्णय

सुबाभळीच्या वाढत्या झाडांमुळे कपाशीचे नुकसान; पाचोऱ्यात शेतकरी हवालदिल, न्यायालयीन लढाईचा निर्णय

0
10


पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शेताच्या शेजारी करण्यात आलेल्या सुबाभळीच्या लागवडीमुळे कपाशी पिकाच्या वाढीवर परिणाम होत असून मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्याने केला आहे. प्रशासनाकडे दाद मागूनही अपेक्षित न्याय न मिळाल्याने अखेर न्यायालयीन लढाईचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय संबंधित शेतकऱ्याने घेतला आहे.

पाचोरा तालुक्यातील लोहटार शिवारात हा प्रकार समोर आला आहे. येथील शेतकरी भिकलाल परदेशी यांची गट क्रमांक ६५८/२ मध्ये दोन एकर जमीन आहे. या जमिनीवर ते नियमितपणे कपाशी किंवा मका या पिकांची लागवड करीत असतात. मात्र, त्यांच्या शेताच्या पूर्वेला असलेल्या जमिनीवर सुबाभळीची लागवड करण्यात आली आहे. सुबाभळीची झाडे मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्याचा शेजारील कपाशी पिकावर परिणाम होत असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. झाडांची वाढ झाल्यामुळे कपाशी पिकाला आवश्यक असलेला सूर्यप्रकाश आणि इतर नैसर्गिक घटक पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने पिकाची वाढ खुंटत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी कपाशीचे उत्पादन घटून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे सांगण्यात आले.

शेतातील पिकावर परिणाम होत असल्याने भिकलाल परदेशी यांनी संबंधित प्रशासनाकडे दाद मागितली. मात्र, प्रशासनाकडून अपेक्षित तोडगा निघाला नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. वारंवार प्रयत्न करूनही प्रश्न सुटत नसल्याने आता न्याय मिळविण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. सुबाभळीच्या वाढत्या झाडांमुळे शेजारील शेतीपिकांचे नुकसान होत असल्यास त्यावर प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन संबंधित शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. पिकांचे नुकसान, उत्पादनातील घट आणि त्यातून निर्माण होणारे आर्थिक संकट यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढत असल्याचे या प्रकरणातून समोर आले आहे.


Protected Content

Play sound