Home Cities जळगाव जुलूसे ईद-ए-मिलाद कमिटीने मानले पोलीस व मनपाचे आभार

जुलूसे ईद-ए-मिलाद कमिटीने मानले पोलीस व मनपाचे आभार

0
19


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुस्लिम बांधवांचा पवित्र सण जश्ने ईद-ए-मिलाद-उन-नबी यावर्षी जळगाव जिल्ह्यात उत्साहपूर्ण आणि शांततेच्या वातावरणात साजरा झाला. जुलूस सुरळीत पार पडण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन आणि जळगाव शहर महानगरपालिकेने केलेल्या नियोजनाबद्दल मरकझी जुलूसे ईद-ए-मिलाद-उन-नबी कमिटीच्या वतीने प्रशासनाचे आभार मानण्यात आले.

ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त मुस्लिम बांधवांकडून दरवर्षी शहरातून जुलूस काढण्यात येतो. यंदाही हा जुलूस आनंद आणि उत्साहात पार पडला. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच जुलूस निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाकडून योग्य पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जुलूस मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती आणि स्वच्छतेकडेही महानगरपालिकेने विशेष लक्ष दिले. जळगाव शहरातील मुस्लिमबहुल भाग, धार्मिक स्थळांचा परिसर तसेच जुलूस निघणाऱ्या प्रमुख मार्गांवरील खड्डे प्रशासनाकडून एका रात्रीत बुजविण्यात आले. तसेच महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्यांनी जुलूस मार्गावर स्वच्छता करून परिसर स्वच्छ ठेवला.  पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या योग्य नियोजनामुळे मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलाद-उन-नबीचा सण आनंदात, उत्साहात आणि शांततेत साजरा करता आला. प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मरकझी जुलूसे ईद-ए-मिलाद-उन-नबी कमिटीच्या वतीने प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त आदित्य जीवने, आरोग्य विभागाचे अतिरिक्त उपायुक्त समीर बोरोले, जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम तसेच विविध पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सुन्नी जामा मस्जिद जळगाव व जुलूसे ईद-ए-मिलाद-उन-नबी कमिटीचे सै. अयाज अली नियाज अली, सय्यद जावेद, मुश्ताक बहेस्ती, अमान बिलाल, कामिल खान, काशिफ टेलर, मुस्तुफा बहेस्ती, इमाम भाया, सय्यद उमर, झिशान हुसैन, आसिफ शाह, जमील शेख, शफी ठेकेदार, अशफाक शाह, सिराज अली, हाशिम कुरेशी यांच्यासह कमिटीचे सदस्य उपस्थित होते.


Protected Content

Play sound