Home Cities जळगाव जळगाव जिल्ह्यात ३० लाखांहून अधिक मतदार ; SIR सर्वेक्षणातून तब्बल ५.१४ लाख...

जळगाव जिल्ह्यात ३० लाखांहून अधिक मतदार ; SIR सर्वेक्षणातून तब्बल ५.१४ लाख संशयित नावे वगळली, ३१ ऑगस्ट रोजी प्रारूप यादी प्रसिद्ध

0
13


जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांची विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) अंतर्गत नवी प्रारूप मतदार यादी आज, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीनुसार जिल्ह्यात सध्या एकूण ३० लाख ३७ हजार ४५६ नोंदणीकृत मतदार आहेत. मात्र, एसआयआर (SIR) सर्वेक्षणादरम्यान आढळलेल्या ५ लाख १४ हजार ८३६ मतदारांची नावे त्रुटींमुळे या प्रारूप यादीतून वगळण्यात आली असून मतदारांना याबाबत दावे व हरकती दाखल करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि जिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिलेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील प्रारूप यादीत १५ लाख ६७ हजार ३७५ पुरुष, १४ लाख ६९ हजार ९९७ महिला आणि ८४ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. मतदारसंख्येच्या दृष्टीने चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ सर्वाधिक ३ लाख २० हजार ८७२ मतदारांसह अव्वल स्थानी आहे. याशिवाय जामनेर मतदारसंघात २ लाख ९६ हजार ६२६, चोपडा मतदारसंघात २ लाख ८५ हजार ४४१, तर अमळनेर मतदारसंघात २ लाख ६२ हजार ५०२ मतदारांची नोंद झाली आहे. प्रारूप यादीत समाविष्ट नसलेल्या ASDD श्रेणीतील ५,१४,८३६ मतांमध्ये ९३,७०९ मृत मतदार, ९५,८०८ गैरहजर मतदार, २,६२,५४५ कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, १,७४० इतर तर ६१,०३४ दुबार किंवा आधीच नोंदणी झालेले मतदार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

मतदार यादी अत्यंत पारदर्शक आणि बिनचूक राहावी यासाठी हे दावे व हरकती मागवण्यात येत असून प्राप्त अर्जांचा निपटारा ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत केला जाईल आणि अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाईल. पात्र मतदारांना आपले नाव यादीत पाहता यावे यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, तहसील कार्यालये, मतदार नोंदणी अधिकारी कार्यालये आणि जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर ही प्रारूप यादी उपलब्ध करण्यात आली आहे. नवीन नोंदणीसाठी नमुना ६, नावात किंवा माहितीत दुरुस्तीसाठी नमुना ८ आणि नाव वगळण्यासाठी नमुना ७ द्वारे ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करता येणार आहे. मतदार यादीत नाव नोंदवताना किंवा बदलाच्या वेळी खोटी घोषणा किंवा चुकीची माहिती दिल्यास कायद्यानुसार कडक कारवाई व शिक्षेची तरतूद असल्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी स्पष्ट केले.


Protected Content

Play sound