



जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र सरकारच्या ३१ जुलै २०२५ च्या शासन निर्णयानुसार यंदा २०२६ पासून ३१ ऑगस्ट हा दिवस राज्यभरात अधिकृतपणे “भटके विमुक्त दिवस” म्हणून साजरा करण्यात येत आहे. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी समाजकल्याण आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भटके विमुक्त घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
ब्रिटिश सरकारने १८७१ मध्ये लागू केलेल्या अन्यायकारक ‘क्रिमिनल ट्राइब ॲक्ट’नुसार बंजारा, कैकाडी, रामोशी, वडार, लाम्हानी, काटबूवा, कोल्हाटी, पारधी यांसारख्या अनेक जातींना जन्मजात गुन्हेगार म्हणून घोषित केले होते. केवळ या समाजात जन्म घेतला म्हणून लहान मुलांनाही पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागत असे, ज्यामुळे हा समाज दीर्घकाळ मुख्य प्रवाहापासून तुटलेला राहिला. ३१ ऑगस्ट १९५२ रोजी हा काळा कायदा अखेर रद्द करण्यात आला आणि या सर्व जमाती स्वतंत्र भारतात मुक्त झाल्या. याच ऐतिहासिक घटनेची स्मृती म्हणून ३१ ऑगस्ट हा दिवस ‘भटके विमुक्त दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे या घटकांमध्ये पोलिसांबद्दल असलेली भीती व अंतर दूर करण्यासाठी जळगाव पोलीस दलाने पुढाकार घेतला आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित सोहळ्यात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि भटके विमुक्त विकास परिषदेचे विभाग संयोजक विकास लोहार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तरुण पिढीने मनात कोणताही न्यूनगंड न बाळगता शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे, तसेच गुन्हेगारी आणि व्यसनाधीनतेपासून दूर राहून मुख्य प्रवाहात सन्मानाने जगावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांना भेटवस्तू म्हणून पुस्तके देण्यात आली. या कार्यक्रमात पल्लवी प्रकाश राठोड, अश्विनी संतोष नन्नावरे, प्रीती आनंदा पारधी, अजय आप्पा चव्हाण, नंदू सुभाष भराडी, जयेश राजू भील आणि विलास नंदलाल राठोड या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.



