Home Cities पारोळा पारोळा शेतकरी सहकारी संघाच्या विकासाची भव्य पायाभरणी ; आ.अमोल पाटील यांच्या हस्ते...

पारोळा शेतकरी सहकारी संघाच्या विकासाची भव्य पायाभरणी ; आ.अमोल पाटील यांच्या हस्ते व्यापारी संकुलांचे भूमिपूजन

0
13


पारोळा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुका शेतकरी सहकारी संघाच्या प्रशासकीय इमारत व १५० हून अधिक व्यापारी संकुलांच्या महत्त्वाकांक्षी बांधकामाचा भव्य भूमिपूजन सोहळा आमदार अमोल पाटील यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. सहकारमहर्षी माजी आमदार चिमणराव पाटील यांनी उभारलेल्या सहकाराच्या भक्कम पायावर आधुनिक विकासाची नवी इमारत उभी करण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात असून, या प्रकल्पातून शेतकरी, व्यापारी आणि पारोळा शहराच्या विकासाला एक नवी दिशा मिळणार आहे.

आमदार अमोल पाटील यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतून साकारण्यात येणाऱ्या या भव्य प्रकल्पात ३ मजली अद्ययावत इमारत, शेतकरी सहकारी संघाचे प्रशासकीय कार्यालय, १५० हून अधिक व्यापारी संकुले, शेतकरी निवास आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. सन १९६२ मध्ये स्थापन झालेल्या पारोळा शेतकरी सहकारी संघाला मोठा ऐतिहासिक वारसा असून, चिमणराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघाने संपूर्ण महाराष्ट्रात १ लाख ११ हजार क्विंटल ज्वारी खरेदीचा विक्रम रचून प्रथम क्रमांक पटकावला होता. आज १०८ संस्था सभासद आणि ७ हजार ३७६ व्यक्ती सभासद असलेली ही संस्था शिवसेनेच्या ताब्यात असून, सहकाराची ही गौरवशाली परंपरा आधुनिकतेशी जोडण्याचे काम या प्रकल्पाद्वारे केले जात आहे.

भूमिपूजन सोहळ्यात बोलताना आमदार अमोल पाटील यांनी स्पष्ट केले की, ही केवळ एका इमारतीची पायाभरणी नसून पारोळ्याच्या विकासाच्या नव्या युगाची सुरुवात आहे. शेतकरी सहकारी संघ हे हजारो शेतकरी कुटुंबांच्या विश्वासाचे केंद्र असून, व्यापाऱ्यांना चालना देण्यासाठी व शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ही वास्तू उभारली जात आहे. या प्रसंगी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी ठराव देणाऱ्या विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या संचालक मंडळांचा व प्रतिनिधींचा आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन बबलू पाटील व कमलेश पाटील यांनी केले.

या सोहळ्यास अमळनेर विधानसभेचे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख मनोज पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, जि.प. माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वरनाना आमले, डॉ. दिनकर पाटील, चतुरभाऊसाहेब पाटील, दयारामअण्णा पाटील यांच्यासह एरंडोल व पारोळा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय नेते, शेतकरी आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पारोळा तालुका शेतकरी सहकारी संघाच्या ३ मजली प्रशासकीय इमारत व १५० हून अधिक व्यापारी संकुलाचे भूमिपूजन आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते झाले. सहकारमहर्षी चिमणराव पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारा हा प्रकल्प शेतकरी, व्यापारी आणि पारोळा शहराच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.


Protected Content

Play sound