
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अपघातात डोक्याला गंभीर दुखापत होऊन मेंदूत मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झालेल्या ४२ वर्षीय रुग्णावर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मेंदू व मणका विकार तज्ज्ञांनी तातडीने यशस्वी शस्त्रक्रिया करून जीवदान दिले. गंभीर अवस्थेत दाखल झालेल्या रुग्णावर वेळेचे महत्त्व ओळखून त्वरित उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे, शस्त्रक्रियेनंतर अवघ्या तीन दिवसांत त्याच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश यांचा अपघात झाल्यानंतर त्यांच्या डोक्याला जोरदार मार लागला. प्रकृती गंभीर झाल्याने नातेवाईकांनी त्यांना तातडीने डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले. मेंदू व मणका विकार तज्ज्ञ डॉ. विपूल राठोड यांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर तातडीने सीटी स्कॅन करण्यात आला. या तपासणीत मेंदू आणि कवटीखाली मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे तसेच रक्तस्त्रावामुळे मेंदूवर मोठा दाब निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले.
रुग्णाची स्थिती गंभीर असल्याने विलंब झाल्यास मेंदूला कायमस्वरूपी इजा होण्याची तसेच जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डॉ. विपूल राठोड, डॉ. प्रितम दास आणि डॉ. श्रृती खंडागळे यांच्या पथकाने ‘डिकंप्रेसिव्ह क्रेनियोटोमी’ ही महत्त्वाची शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेद्वारे मेंदूवरील वाढलेला दाब कमी करण्यात आला आणि साचलेले रक्त बाहेर काढण्यात आले.
शस्त्रक्रियेसाठी भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ. शितल, डॉ. साक्षी आणि डॉ. सुश्मिता यांनी सहकार्य केले. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला काही काळ कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले. अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या सतत देखरेखीखाली उपचार सुरू ठेवण्यात आले. उपचारांना रुग्णाने चांगला प्रतिसाद दिला आणि अवघ्या तीन दिवसांत त्याच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली.
ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले योजनेंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आल्याने रुग्णाच्या कुटुंबीयांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला.
“डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीनंतर मेंदूत रक्तस्त्राव झाल्यास प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असते. या रुग्णाच्या सीटी स्कॅनमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव व मेंदूवर दाब दिसून आला. त्यामुळे विलंब न करता डिकंप्रेसिव्ह क्रेनियोटोमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर अतिदक्षता विभागातील उपचार आणि सतत निरीक्षणामुळे रुग्णाच्या प्रकृतीत अपेक्षेप्रमाणे सुधारणा झाली,” अशी माहिती डॉ. श्रृती खंडागळे यांनी दिली.
अपघातानंतर मेंदूत रक्तस्त्राव झाल्यास तातडीने निदान व उपचार मिळणे किती महत्त्वाचे आहे, हे या प्रकरणातून स्पष्ट झाले असून, डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील तज्ज्ञांच्या तत्पर उपचारामुळे ४२ वर्षीय रुग्णाला नवजीवन मिळाले.



