Home Cities मुक्ताईनगर नाथाभाऊंच्या अभीष्टचिंतन सोहळ्याची जय्यत तयारी; कोथळीत जमणार राजकीय दिग्गज

नाथाभाऊंच्या अभीष्टचिंतन सोहळ्याची जय्यत तयारी; कोथळीत जमणार राजकीय दिग्गज

0
8


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्याचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) यांच्या अमृत महोत्सवी ७५व्या वर्षात पदार्पणानिमित्त श्रीक्षेत्र कोथळी येथील पावन श्री संत मुक्ताई जुने मंदिर परिसरात अध्यात्म, भक्ती आणि वारकरी परंपरेचा भव्य सोहळा सुरू आहे. ‘अमृत महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह, संगीत श्री संत मुक्ताई चरित्र तथा संगीत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्या’च्या माध्यमातून धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू असून, रविवार, ३० ऑगस्ट रोजी होणाऱ्या अभीष्टचिंतन सोहळ्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

आमदार एकनाथराव खडसे यांच्या ७५व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या सोहळ्याला राज्यभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे दौरे निश्चित झाले आहेत. त्यामुळे कोथळी परिसरात उत्साहाचे वातावरण असून मुख्य अभीष्टचिंतन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. अध्यात्मिक कार्यक्रमांसोबतच विविध राजकीय पक्षांतील दिग्गज नेत्यांची उपस्थिती या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.

या भव्य सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे शनिवार, २९ ऑगस्ट रोजी सकाळी आमदार एकनाथराव खडसे यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर रविवार, ३० ऑगस्ट रोजी होणाऱ्या मुख्य अभीष्टचिंतन सोहळ्यासाठी विविध मान्यवरांची उपस्थिती निश्चित करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, शेकापचे अध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय पालकमंत्री गुलाबराव पाटील, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचीही उपस्थिती राहणार आहे.

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, आमदार चैनसुख संचेती, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि मध्य प्रदेशच्या माजी मंत्री अर्चना चिटणीस यांच्यासह अन्य मान्यवरही या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

एकनाथराव खडसे यांच्या प्रदीर्घ राजकीय आणि सामाजिक वाटचालीला ७५ वर्षांच्या अमृत महोत्सवी टप्प्यावर शुभेच्छा देण्यासाठी विविध राजकीय विचारसरणींचे नेते एकाच व्यासपीठावर येणार असल्याने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे कोथळी येथे होणाऱ्या या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.

दरम्यान, श्रीक्षेत्र कोथळी येथील श्री संत मुक्ताई जुने मंदिर परिसरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू असल्याने भाविकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. संत मुक्ताई चरित्र आणि श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

 


Protected Content

Play sound