



चोपडा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील विवेकानंद विद्यालयाच्या ३५० विद्यार्थिनींनी यावर्षी रक्षाबंधनाचा सण अत्यंत अनोख्या आणि कृतज्ञतापूर्वक पद्धतीने साजरा केला. विद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या सुमारे एक हजारांहून अधिक राख्या सीमावर्ती भागात तैनात असलेल्या देशाच्या वीर जवानांना पाठवून तसेच भुसावळ येथील मिलिटरी स्टेशनला प्रत्यक्ष भेट देऊन सैनिकांना राख्या बांधल्या.
विद्यालयाचे तंत्रस्नेही कलाशिक्षक राकेश विसपुते यांच्या कल्पकतेतून इयत्ता पाचवी ते दहावीच्या साडेतीनशे विद्यार्थिनींसाठी ‘एक राखी सैनिक दादाच्या नावाने’ हा उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थिनींनी केवळ राख्याच बनवल्या नाहीत, तर सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्वतःच्या हस्ताक्षरात भावुक पत्रेही लिहिली. जळगाव जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांच्या मदतीने या राख्या व पत्रे सीमेवरील सैनिकांपर्यंत पोहोचवण्यात आली, ज्याची पोच म्हणून सैनिकांनी विद्यार्थिनींना फोन, व्हिडिओ कॉल आणि व्हॉट्सॲप मेसेजद्वारे थेट संपर्क साधून आभार मानले.
या उपक्रमाचा दुसरा टप्पा म्हणून भुसावळ येथील मिलिटरी स्टेशन हेडक्वार्टर्सचे कर्नल श्रीवास्तव यांची भेट घेऊन राख्या सुपूर्द करण्यात आल्या. तसेच रक्षाबंधनाच्या दिवशी विद्यालयातील इयत्ता आठवी व नववीच्या २१ विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी भुसावळ सैनिक छावणीत प्रत्यक्ष जाऊन तब्बल २०० सैनिकांना राख्या बांधल्या. सण-उत्सवाच्या दिवशीही कुटुंबापासून दूर राहून अहोरात्र देशसेवा करणाऱ्या जवानांसोबत हा अविस्मरणीय सोहळा पार पडला.
यासोबतच विद्यालयाच्या परंपरेनुसार आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींनी चोपडा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, स्थानिक रुग्णालयातील रुग्ण, बस स्थानक व आगारातील कर्मचाऱ्यांनाही प्रत्यक्ष भेट देऊन राख्या बांधल्या. मुख्याध्यापिका सरला शिंदे आणि पर्यवेक्षक पवन लाठी यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती आदर आणि सामाजिक बांधिलकी जपणारा हा प्रेरणादायी उपक्रम संस्था अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर यांच्या प्रेरणेने पार पडला. या उपक्रमाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद व पालकांनी विद्यार्थिनींचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक कौतुक केले आहे.



