Home Cities चोपडा राखीच्या धाग्यात जपला बहिणींच्या मायेचा अनमोल ठेवा; मंत्री गुलाबराव पाटील यांनी चोपड्यात...

राखीच्या धाग्यात जपला बहिणींच्या मायेचा अनमोल ठेवा; मंत्री गुलाबराव पाटील यांनी चोपड्यात साजरे केले रक्षाबंधन

0
36


चोपडा / जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  पदे बदलतात, जबाबदाऱ्या वाढतात आणि काळ पुढे सरकतो; मात्र भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, माया आणि जिव्हाळा कायम तसाच राहतो, याची प्रचीती नुकतीच रक्षाबंधनाला आली. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चोपडा येथे आपल्या बहिणी निर्जलाताई देशमुख आणि सुशीलाताई गुजर यांच्या घरी जाऊन अत्यंत कौटुंबिक आणि आपुलकीच्या वातावरणात रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा केला.
सार्वजनिक जीवनातील व्यस्तता आणि मंत्रीपदाच्या जबाबदाऱ्या बाजूला ठेवून पालकमंत्री पाटील यांनी बहिणींच्या घरी भेट दिली. यावेळी बहिणींनी त्यांचे पारंपारिक पद्धतीने औक्षण करून मनगटावर राखी बांधली आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी तसेच दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. पालकमंत्री पाटील यांनीही बहिणींना भेटवस्तू देत कौटुंबिक स्नेह व्यक्त केला. यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळून वातावरण अत्यंत भावनिक आणि आनंदमय झाले होते.
याप्रसंगी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, राजकारणात कितीही मोठी पदे मिळाली तरी बहिणीसाठी भाऊ हा कायम भाऊच असतो. मनगटावर बांधलेल्या राखीच्या छोट्या धाग्यात बालपणाच्या असंख्य आठवणी, आई-वडिलांचे संस्कार आणि बहिणीची आयुष्यभराची माया गुंफलेली असते. बहिणींचे प्रेम आणि आशीर्वाद हीच खरी श्रीमंती असल्याचे सांगत त्यांनी आपल्या लाडक्या बहिणींच्या सुख-दुःखात सदैव पाठीशी उभे राहण्याची ग्वाही दिली.
मंत्रिपदाच्या धावपळीतही नात्यांमधील जिव्हाळा जपणारा हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास नगरसेवक आबा पाटील, राजेंद्र पाटील, मोतीआप्पा पाटील, नवलराजे पाटील यांच्यासह दोन्ही बहिणींच्या परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content

Play sound