Home Cities मुक्ताईनगर आमदार एकनाथराव खडसे अमृत महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहात ज्ञानोबा-मुक्ताईच्या अलौकिक वात्सल्याचे चरित्रकथन

आमदार एकनाथराव खडसे अमृत महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहात ज्ञानोबा-मुक्ताईच्या अलौकिक वात्सल्याचे चरित्रकथन

0
13


मुक्ताईनगर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्याचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी पदार्पणाचे औचित्य साधून श्रीक्षेत्र कोथळी येथील पावन श्री संत मुक्ताई जुने मंदिर परिसरात अध्यात्म आणि भक्तीचा अपूर्व सोहळा आकारास आला आहे. येथे आयोजित ‘अमृत महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह, संगीत श्री संत मुक्ताई चरित्र तथा संगीत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचा’ तिसरा दिवस शुक्रवारी (दि. २८ ऑगस्ट २०२६) अत्यंत भावपूर्ण, मंगलमय आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

सप्ताहाच्या या तिसऱ्या दिवशी श्री संत मुक्ताई चरित्रकार ह.भ.प. विशाल महाराज खोले यांच्या ओघवत्या अन् रसाळ वाणीतून वारकरी सांप्रदायाचा गाभा असलेले श्री संत आदिशक्ती मुक्ताई चरित्राचे चरित्रकथन पार पडले. यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत मुक्ताबाई यांच्या माता-पित्याने कुलधर्मासाठी सोसलेले देहांत प्रायश्चित्त, त्यानंतर चारही बालभावंडांच्या वाट्याला आलेला कारुण्यमयी विरह आणि त्यांच्यातील अतुट आत्मबंध याचे हृदयस्पर्शी वर्णन महाराजश्रींनी केले. “क्रियेपेक्षा अंतःकरणातील भावच खरा श्रेष्ठ असतो आणि कोणत्याही नात्याचा खरा पाया हा परस्परांवरील निस्सीम स्नेह व सांभाळण्याची वृत्ती हाच असतो,” असा उद्बोधक संदेश त्यांनी या प्रसंगी श्रोत्यांच्या मनी बिंबवला.

दुपारच्या सत्रात ‘संगीत श्रीमद् भागवत कथेचे’ सुश्राव्य वाचन ह.भ.प. श्री. खगेन्द्रजी महाराज (शहादेकर) यांच्या तृप्त करणाऱ्या वाणीतून संपन्न झाले, ज्याने हजारो भाविकांचे अंतरंग भक्तिरसात न्हाऊन निघाले. या संपूर्ण धार्मिक महोत्सवास सतपंथ आचार्य प.पू. महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांची पावन उपस्थिती व मार्गदर्शक आशीर्वाद लाभले. विशेष म्हणजे, आज महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांचा प्रकट दिन असल्याने उपस्थित सर्व मान्यवरांसह अथांग जनसागराने त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन शुभाशीर्वाद ग्रहण केले व महाराजांना उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. दिवसभराच्या विविध धार्मिक उपक्रमांनंतर रात्रीच्या सत्रात ह.भ.प. सोपान महाराज ताथवडे (हिंगोली) यांची रसाळ व प्रबोधनात्मक कीर्तनसेवा संपन्न झाली, ज्यासाठी हजारो वारकरी व भाविकांनी अलोट गर्दी केली होती.

पहाटेची प्रसन्न काकडा आरती, विष्णू सहस्रनाम पठण, मुक्ताई चरित्राचे पारायण आणि सायंकाळचा करुणाघन हरिपाठ अशा आहोरात्र चालणाऱ्या धार्मिक विधींमुळे संपूर्ण कोथळी परिसर अक्षरशः वैकुंठासारखा भासत आहे. नाथाभाऊंच्या या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने पंचक्रोशीतील भाविक आणि वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिरसाचा अखंड आनंद लुटत आहेत.


Protected Content

Play sound