
मुक्ताईनगर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शासकीय नियमांनुसार महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेलाच मुख्य जबाबदार अधिकारी गैरहजर राहिल्याने मुक्ताईनगर तालुक्यात मोठा प्रशासकीय गोंधळ उडाला आहे. पिंप्री अकाराऊत येथे आयोजित ग्रामसभेला ग्रामसेवक गैरहजर राहिल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामसभेवर तीव्र बहिष्कार टाकला असून, याप्रकरणी प्रशासनाकडे धाव घेत ग्रामपंचायत कार्यालयाला सील लावण्याची आग्रही मागणी केली आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्री अकाराऊत येथे २७ ऑगस्ट रोजी शासकीय नियमावलीनुसार महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा व निर्णय घेण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या ग्रामसभेस जबाबदार ग्रामसेवक उपस्थित न राहिल्याने उपस्थितांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. ग्रामसेवकाच्या या बेजबाबदार वृत्तीमुळे आक्रमक झालेल्या गावकऱ्यांनी सभेचे कामकाज सुरू न होऊ देता थेट ग्रामसभेवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेतला.
या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी मुक्ताईनगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (बीडीओ) यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनात नमूद केल्यानुसार, ग्रामसेवक गैरहजर असल्याने गटविकास अधिकाऱ्यांनी सुधाकर कवरसिंग तायडे यांची प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली होती, मात्र त्याबाबत कोणतीही स्पष्ट व पूर्वसूचना न देण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे ही सभा अमान्य असून ग्रामसेवकाच्या गैरहजेरीत पार पडणाऱ्या कोणत्याही सभेला ग्रामस्थांचा विरोध असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
त्याचप्रमाणे, जोपर्यंत प्रत्यक्ष ग्रामसेवकांच्या उपस्थितीत नियमानुसार कायदेशीर ग्रामसभा आयोजित केली जात नाही, तोपर्यंत ग्रामपंचायतीचे सर्व कामकाज त्वरित थांबवून कार्यालयाला प्रशासनाने सील लावावे, अशी कठोर मागणी गावकऱ्यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि जळगाव जिल्हाधिकारी यांनाही योग्य त्या कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत. ऐन ग्रामसभेत अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे निर्माण झालेल्या या वादंगामुळे पिंप्री अकाराऊतसह संपूर्ण मुक्ताईनगर तालुक्यात प्रशासकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.



