Home Cities जळगाव नवीन तिकीट बुकिंग कार्यालयाचे खा. स्मिता वाघ यांच्या हस्ते भव्य उद्घाटन!

नवीन तिकीट बुकिंग कार्यालयाचे खा. स्मिता वाघ यांच्या हस्ते भव्य उद्घाटन!

0
2


जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरासह परिसरातील हजारो रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी जळगाव रेल्वे स्थानकाच्या उत्तर बाजूस (छत्रपती शिवाजीनगर बाजूने) नव्याने उभारण्यात आलेल्या अद्ययावत तिकीट बुकिंग कार्यालयाचे आज अत्यंत उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या नव्या उपक्रमामुळे उत्तर भागातील प्रवाशांची तिकीट काढण्यासाठी होणारी धावपळ थांबणार असून वेळेची मोठी बचत होणार आहे.

हे बहुप्रतिक्षित उद्घाटन आज दिनांक २७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ०६:०० वाजता जळगावच्या खासदार सौ. स्मिता वाघ यांच्या शुभहस्ते फीत कापून अधिकृतपणे पार पडले. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील तसेच भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) पुनीत अग्रवाल यांची उपस्थिती लाभली.

या सोहळ्यास रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, ज्यात सीनियर डीसीएम अजय कुमार, आरपीएफचे कमांडंट चित्रेश जोशी, जळगाव रेल्वे स्थानकाचे स्टेशन मॅनेजर कौस्तुभ चौधरी, जनसंपर्क अधिकारी जीवन चौधरी आणि आरपीएफचे पोलिस निरीक्षक अमित कुमार यादव प्रामुख्याने उपस्थित होते. उद्घाटन समारंभानंतर मान्यवरांच्या हस्ते या नवीन खिडकीवरून तिकीट खरेदी करणाऱ्या पहिल्या प्रवाशास सन्मानपूर्वक तिकीट प्रदान करण्यात आले. तसेच खासदार सौ. स्मिता वाघ आणि आमदार राजूमामा भोळे यांनी स्वतः तिकीट खरेदी करून या नव्या प्रणालीचा अधिकृत शुभारंभ केला. छत्रपती शिवाजीनगर आणि उत्तर जळगावातील नागरिकांना यापूर्वी तिकीट काढण्यासाठी मुख्य प्रवेशद्वाराकडे किंवा उड्डाणपुलाचा वापर करून दक्षिण बाजूला जावे लागत होते. मात्र, या नवीन तिकीट बुकिंग कार्यालयामुळे नागरिकांची मोठी सोय झाली असून प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.


Protected Content

Play sound