Home Cities जळगाव गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका ‘अॅक्शन मोड’मध्ये; उपमहापौरांनी दिल्या महत्त्वपूर्ण सूचना

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका ‘अॅक्शन मोड’मध्ये; उपमहापौरांनी दिल्या महत्त्वपूर्ण सूचना

0
18


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील स्वच्छता, विद्युत व्यवस्था आणि सार्वजनिक सुविधा सुरळीत ठेवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने विशेष तयारी सुरू केली आहे. गणेशमूर्ती स्थापनेच्या दिवशी नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी उपमहापौर मनोज चौधरी यांनी संबंधित विभागप्रमुखांची बैठक घेऊन विविध उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

या बैठकीस विद्युत विभाग प्रमुख, उपायुक्त (आरोग्य), उपायुक्त (अतिक्रमण) तसेच शहर अभियंता यांची उपस्थिती होती. गणेशोत्सवाच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ वाढत असल्याने स्वच्छता, रस्त्यांवरील प्रकाश व्यवस्था आणि गणेश मंडळांच्या परिसरातील मूलभूत सुविधांकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

गणेशमूर्ती स्थापना होणाऱ्या दिवशी शहरातील प्रमुख रस्ते, गल्लीबोळ तसेच गणेश मंडळांच्या परिसरात विशेष स्वच्छता व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यासाठी आवश्यक त्या ठिकाणी विशेष घंटागाड्यांची व्यवस्था करण्यात यावी, तसेच गरजेनुसार अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आले. गणेश मंडळांच्या परिसरात तसेच मूर्ती मिरवणुकीच्या मार्गावर कचरा साचणार नाही, याची दक्षता घेण्याचेही सांगण्यात आले.

गणेशोत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात फुले, हार आणि इतर निर्माल्य जमा होते. या निर्माल्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निर्माल्याचे डी-कंपोस्टिंग करता यावे, यासाठी महानगरपालिकेने योग्य जागेची निवड करून आवश्यक खड्डा किंवा निर्माल्य संकलनाची व्यवस्था करावी, असे सांगण्यात आले. त्यामुळे निर्माल्य थेट कचऱ्यात किंवा सार्वजनिक ठिकाणी टाकले जाण्याचे प्रकार टाळण्यास मदत होणार आहे.

शहरातील बंद पथदिव्यांच्या दुरुस्तीवरही विशेष भर देण्यात आला. मुख्य रस्ते, गल्लीबोळ आणि विशेषतः गणेश मंडळांच्या परिसरातील बंद असलेले पथदिवे व विद्युत व्यवस्था गणेशमूर्ती स्थापनेच्या दिवसापूर्वी तपासून घेण्याचे निर्देश विद्युत विभागाला देण्यात आले. कोणत्याही गणेश मंडळाच्या परिसरात अंधार राहणार नाही, यासाठी आवश्यक त्या दुरुस्त्या तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

गणेशोत्सव हा जळगाव शहरातील नागरिकांच्या श्रद्धेचा आणि उत्साहाचा महत्त्वाचा सण आहे. या काळात नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि प्रकाशमय वातावरण उपलब्ध करून देणे ही महानगरपालिकेची जबाबदारी असल्याचे उपमहापौरांनी स्पष्ट केले. त्यानुसार सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधून काम करावे आणि नियोजित उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.


Protected Content

Play sound