Home क्रीडा पुणे जिल्ह्याचा महिला फुटबॉलमध्ये दणदणीत विजय

पुणे जिल्ह्याचा महिला फुटबॉलमध्ये दणदणीत विजय

0
1


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात रंगलेल्या आंतरजिल्हा महिला खुल्या गटाच्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत पुणे जिल्हा महिला संघाने दमदार खेळाचे प्रदर्शन करत २०२५-२६ चे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात पुण्याने मुंबई जिल्हा संघाचा ३-० असा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले. मुंबईला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर अहिल्यानगरने तृतीय आणि ठाणे जिल्ह्याने चौथे स्थान मिळविले.

वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जैन स्पोर्ट्स अकॅडमी, गोदावरी फाउंडेशन, पिंच बॉटलिंग आणि स्पोर्ट्स हाऊस जळगाव यांच्या सहकार्याने झालेल्या या स्पर्धेला फुटबॉलप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तृतीय क्रमांकासाठी अहिल्यानगर आणि ठाणे यांच्यात झालेली लढत अत्यंत चुरशीची ठरली. नियोजित वेळेत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. त्यामुळे सामन्याचा निकाल टायब्रेकरमध्ये लावण्यात आला. यात अहिल्यानगरने ३-१ असा विजय मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. यानंतर पुणे आणि मुंबई यांच्यात विजेतेपदासाठी अंतिम सामना रंगला. पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करत एकमेकांवर दबाव निर्माण केला; मात्र गोल करण्यात कोणत्याही संघाला यश आले नाही. दुसऱ्या हाफमध्ये पुणे संघाने खेळाची गती वाढवत मुंबईवर स्पष्ट वर्चस्व निर्माण केले. पुण्याच्या राणी कदम, तनिक्षा आणि रितिका सिंग यांनी गोल करत संघाला ३-० असा शानदार विजय मिळवून दिला.

अंतिम सामन्यातील प्रभावी कामगिरीसाठी पुण्याची याशिका तेजवानी हिची उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. तृतीय क्रमांकाच्या सामन्यात अहिल्यानगरची राणी कदम हिला उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कारांमध्ये मुंबईची निकिता देसाई हिला उत्कृष्ट गोलरक्षक, ठाण्याची साधिका शाम हिला उत्कृष्ट बचावपटू, पुण्याची रितिका सिंग हिला उत्कृष्ट आक्रमक खेळाडू, तर अहिल्यानगरची सोमय्या शेख हिला स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणारी खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.

स्पर्धेतील प्रथम चार क्रमांकाच्या संघांना ट्रॉफी आणि पदके देण्यात आली. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि क्रीडा साहित्य देऊन गौरविण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभास जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हा दंडाधिकारी वैशाली चव्हाण, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्रीडा संचालक दिनेश पाटील, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त नेहा देशमुख, कोल्हापूरचे राजेंद्र राऊत आणि वहिदत ए इस्लामीचे अब्दुल वहाब मलिक यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

व्यासपीठावर जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेच्या कार्याध्यक्ष प्रा. डॉ. अनिता कोल्हे, सचिव फारूक शेख, भास्कर पाटील, ताहेर शेख, अॅड. आमिर शेख, सिलेक्टर एनी पॉल तसेच पृथ्वी गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी खासदार स्मिताताई वाघ यांनी महिला खेळाडूंना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आत्मविश्वासाने पुढे जावे. ‘मी करू शकते, मी करणार आणि मी जिंकणार’ ही जिद्द प्रत्येक महिलेच्या मनात असली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. विजयाबरोबरच पराभवाचाही अनुभव खेळाडूंच्या आयुष्यात महत्त्वाचा असतो आणि त्यातूनच भविष्यातील यशाचा मार्ग तयार होतो, असेही त्यांनी नमूद केले. निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी क्रीडाक्षेत्रातून महिलांना उज्ज्वल करिअर घडविण्याची संधी असल्याचे सांगितले. खेळाच्या माध्यमातून शासकीय सेवेत प्रवेश करून देशसेवा करण्याची संधी महिलांनी साधावी, असे आवाहन त्यांनी केले.

वहिदत ए इस्लामीचे अब्दुल वहाब मलिक यांनी ईद-ए-मिलादच्या निमित्ताने महिला खेळाडूंना सामाजिक प्रबोधनपर मार्गदर्शन केले. कन्याभ्रूणहत्या, आत्महत्या, प्रदूषण आणि नशाखोरी यांसारख्या सामाजिक समस्यांविरोधात जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात योगदान देणाऱ्या फिजिओथेरपिस्ट, डॉक्टर, पंच तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या १०८ रुग्णवाहिका सेवेचा जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे क्रीडा साहित्य देऊन गौरव करण्यात आला. पदाधिकारी, स्वयंसेवक, पंच, वैद्यकीय पथक आणि सहकार्य करणाऱ्या संस्थांच्या अथक परिश्रमामुळे स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. जळगावमध्ये राज्यस्तरीय महिला फुटबॉल स्पर्धेचे दर्जेदार आयोजन झाल्याने जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. महिला फुटबॉल खेळाडूंना राज्यस्तरावर आपले कौशल्य दाखविण्यासाठी या स्पर्धेने महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव फारूक शेख यांनी केले, तर आभार कार्याध्यक्ष प्रा. डॉ. अनिता कोल्हे यांनी मानले.


Protected Content

Play sound