
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी तंत्रनिकेतन, जळगाव येथे प्रथम वर्षाच्या नवागत विद्यार्थ्यांसाठी ‘आरंभ’ इंडक्शन कार्यक्रम २०२६-२७ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. नव्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वातावरण, शैक्षणिक पद्धती, विविध उपक्रम व उपलब्ध संधी तसेच विद्यार्थी म्हणून असलेल्या जबाबदाऱ्यांची माहिती करून देणे, हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागताने करण्यात आली. यावेळी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयीन जीवनात केवळ अभ्यासालाच नव्हे, तर व्यक्तिमत्त्व विकासालाही महत्त्व देण्याचे आवाहन केले. आत्मविश्वास, प्रभावी संवादकौशल्य, शिस्त, तांत्रिक ज्ञान आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
गोदावरी तंत्रनिकेतनचे समन्वयक प्रा. दीपक झांबरे यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील नियम, शैक्षणिक धोरणे, उपस्थितीचे महत्त्व, शिस्त तसेच विविध शैक्षणिक आणि सह-अभ्यासक्रम उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. महाविद्यालयीन जीवनाचा योग्य उपयोग करून विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाला सकारात्मक दिशा द्यावी, असे त्यांनी सांगितले.
दुपारच्या सत्रात गोदावरी आयएमआरचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी मानवी मूल्ये, सह-अभ्यासक्रम उपक्रम आणि लिंग-समानता या विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षणासोबतच परस्पर आदर, समानता, सर्जनशीलता, सहकार्य आणि मानवी मूल्यांची जपणूक करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षणासोबत सामाजिक भानही विकसित करावे, असा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास ही केवळ महाविद्यालयाची जबाबदारी नसून विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापक यांच्या संयुक्त प्रयत्नांतून तो साध्य होतो, असे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील गुणांचा विकास, शिस्त आणि करिअरविषयक मार्गदर्शन यासाठी पालकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
पालक मेळाव्यात उपस्थित पालकांनीही महाविद्यालयीन शिक्षण, विद्यार्थ्यांच्या विकासासाठी राबविण्यात येणारे उपक्रम आणि भविष्यातील संधी याबाबत आपल्या सूचना व अपेक्षा व्यक्त केल्या. या संवादामुळे विद्यार्थी, पालक आणि महाविद्यालय प्रशासन यांच्यात अधिक सुसंवाद निर्माण होण्यास मदत झाली.
यावेळी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनीही नवागत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी आपल्या शैक्षणिक अनुभवांपासून करिअरच्या प्रवासापर्यंत विविध बाबी विद्यार्थ्यांसमोर मांडल्या. महाविद्यालयीन काळात उपलब्ध संधींचा योग्य उपयोग कसा करावा, कौशल्यविकासावर कसा भर द्यावा आणि भविष्यातील करिअरसाठी कोणत्या प्रकारे तयारी करावी, याबाबत माजी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले.
अंतिम सत्रात डॉ. पी. पी. चौधरी, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव आणि प्रा. नितीन पाटील, अधिष्ठाता यांनी विद्यार्थ्यांना ‘घ’ योजना, शैक्षणिक रचना, मूल्यमापन पद्धती आणि क्रेडिट्स याबाबत माहिती दिली. तंत्रनिकेतनमधील अभ्यासक्रमाची रचना, मूल्यमापनाचे विविध टप्पे आणि शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक बाबी समजावून सांगण्यात आल्या.
कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. नेहा चौधरी व प्रा. हर्षा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रथम वर्ष विभागातील प्राध्यापकांच्या सहकार्याने ‘आरंभ’ इंडक्शन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वेणू फिरके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी आयोजकांचे कौतुक केले.



