Home Cities जळगाव मुलांकडे दुर्लक्ष करून संपत्ती वाढविण्याचा हव्यास वृद्धाश्रम वाढीला कारणीभूत : विजय लुल्हे

मुलांकडे दुर्लक्ष करून संपत्ती वाढविण्याचा हव्यास वृद्धाश्रम वाढीला कारणीभूत : विजय लुल्हे

0
16


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । “मुलांकडे दुर्लक्ष करून केवळ प्रॉपर्टी वाढविण्याचा हव्यास ठेवणे, हीच वृद्धाश्रमांची संख्या वाढण्यामागील एक प्रमुख कारण आहे,” असे प्रतिपादन भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हाध्यक्ष विजय लुल्हे यांनी केले. आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त संजीवन ज्येष्ठ नागरिक मंडळ आणि भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.

शुक्रवार, २१ ऑगस्ट रोजी हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन अनौपचारिक पद्धतीने सत्कार करण्यात आला. प्रारंभी संबंधित ज्येष्ठांच्या कुटुंबीयांकडून अग्रपूजन व औक्षण करण्यात आले. त्यानंतर शाल, श्रीफळ आणि पुस्तक देऊन विजय लुल्हे यांच्या हस्ते ज्येष्ठांचा हृद्य सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना विजय लुल्हे म्हणाले की, निवृत्ती म्हणजे आयुष्याचा शेवट नसून एका नव्या आणि अर्थपूर्ण जीवनाची सुरुवात आहे. शरीराला विश्रांती द्यावी, मात्र मनाला कधीही निवृत्त करू नये. आयुष्यभर मिळवलेला अनुभव केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो समाजाच्या उपयोगी आणावा, असे आवाहन त्यांनी केले.

कला, संगीत, क्रीडा, प्रवास, वाचन आणि लेखन यांसारख्या आवडत्या छंदांना उत्तरायुष्यात वेळ देऊन जीवन अधिक आनंदी व अर्थपूर्ण करता येते. सार्वजनिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आपल्या अनुभवाचे संचित समाजाला द्यावे, असेही लुल्हे यांनी सांगितले.  कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शामकांत वर्डीकर यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली. तसेच जागतिक ज्येष्ठ आरोग्य दिन साजरा करण्यामागील पार्श्वभूमी आणि ज्येष्ठांच्या आरोग्यविषयक गरजांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.  या उपक्रमात ८५ वर्षीय श्रीमती भागीरथी पुना बारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पतीच्या निधनानंतर आर्थिक अडचणींचा सामना करत त्यांनी शेतीकाम तसेच नागवेल पानांच्या जोडणीचे काम करून आपल्या पाच मुलांचे शिक्षण पूर्ण केले. प्रतिकूल परिस्थितीत कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पार पाडल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. ७२ वर्षीय सौ. पुष्पा जाधव या सेवानिवृत्त बीएसएनएल कर्मचारी असून, त्यांनी नोकरीसोबत कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत मुलांना उच्च शिक्षण दिले. त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांचा सत्कार करण्यात आला.

७५ वर्षीय न्हानू बुधा दाभाडे यांनी पत्नीच्या अकाली निधनानंतर पुनर्विवाह न करता आपल्या तीन मुलांचे संगोपन केले आणि त्यांना शिक्षण दिले. प्रतिकूल परिस्थितीत पालक म्हणून निभावलेल्या जबाबदारीबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. ६८ वर्षीय इंजि. साहेबराव देवराम पाटील हे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ अभियंता संघटनेचे माजी उपाध्यक्ष आहेत. तसेच शासकीय अभियंता सहकारी पतपेढी मर्यादित, जळगावचे संस्थापक चेअरमन व आजीव अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांच्या पुढाकारातून अभियंता भवन, वाचनालय व ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली असून, वाचन चळवळीला चालना देण्याचे कार्य ते करीत आहेत. सोसायटीच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना धनादेश देऊन सन्मानित करणे तसेच विविध समाजप्रबोधनपर कार्यक्रम राबविण्याचे कार्यही साहेबराव पाटील करीत आहेत. त्यांच्या सामाजिक आणि वाचन चळवळीतील योगदानाचीही यावेळी दखल घेण्यात आली. या कार्यक्रमाला संजीवन ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सहसचिव प्रकाश बारी, निवृत्त बीएसएनएल कर्मचारी डिगंबर ढाके, मल्हारराव होळकर कला, ज्ञान-विज्ञान बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष शामकांत वर्डीकर यांच्यासह पद्माकर जाधव, श्रीधर जाधव, सौ. आरती जाधव, ग्रिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कारप्राप्त कलाशिक्षक सुनील दाभाडे, सौ. दीक्षा दाभाडे, सौ. कविता पवार, अंकिता मावळे, सौ. कल्पना पाटील आणि विश्वेश पाटील उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कारामागील प्रेरणा संजीवन ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष पुंडलिक म्हस्के, सचिव प्रकाश बारी, सहसचिव तथा प्रख्यात कथालेखक दीपक तांबोळी, खजिनदार सुनील नेमाडे आणि संचालिका तथा कवयित्री इंदिरा जाधव यांनी दिली. उपाध्यक्ष सुनील जाधव आणि सहखजिनदार उल्हास चौधरी यांनी या उपक्रमासाठी अमूल्य सहकार्य केले. ज्येष्ठांचा सन्मान हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता त्यांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा समाजाच्या विकासासाठी उपयोग व्हावा, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. कुटुंबव्यवस्थेत ज्येष्ठांना सन्मानाचे स्थान देणे, मुलांशी भावनिक नाते जपणे आणि उत्तरायुष्य सामाजिकदृष्ट्या सक्रियपणे जगणे हीच निरोगी समाजाची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.


Protected Content

Play sound