
जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पिंपळे खुर्द येथे एका ५४ वर्षीय शेतकऱ्याचा स्वतःच्या शेतातील सुमारे ८० फूट खोल विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वासुदेव भालेराव पाटील (वय ५४, रा. पिंपळे खुर्द) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ऐन सत्कार सोहळा सोडून घटनास्थळाकडे धाव घेत विहिरीतून मृतदेह बाहेर काढला.

जळगाव शहरातील नयनतारा मॉलमध्ये एका न्यूज चॅनेलच्या रौप्य महोत्सवानिमित्त विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि महापौरांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. हा सोहळा सुरू असतानाच कैलास मधुकर माळी यांनी भ्रमणध्वनीवरून पिंपळे खुर्द येथील ८० फूट खोल विहिरीत वासुदेव पाटील हे पडल्याची आपत्कालीन माहिती अग्निशमन विभागाला दिली. माहिती मिळताच कर्तव्याला प्राधान्य देत अग्निशमन पथकाने क्षणाचाही विलंब न करता सत्कार सोहळा सोडून रेस्क्यू किटसह थेट धरणगावकडे कूच केले.
अग्निशमन दलाचे पथक पिंपळे खुर्द येथे पोहोचले तेव्हा विहीर तब्बल ८० फूट खोल असल्याने बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक आणि कठीण होते. तरीदेखील अग्निशमन प्रमुख देविदास सुरवाडे यांच्या नेतृत्वाखाली वाहनचालक प्रदीप धनगर, फायरमन रोहिदास चौधरी, यश मनोरे आणि योगेश पाटील यांनी स्थानिक सरपंच, पोलीस पाटील व गावकऱ्यांच्या मदतीने रेस्क्यू किटच्या साहाय्याने खोल विहिरीत उतरून शोधमोहीम राबवली. जवानांनी अथक प्रयत्नांनंतर वासुदेव पाटील यांना विहिरीतून बाहेर काढून पोलिसांच्या व गावकऱ्यांच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
वासुदेव पाटील यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असला तरी त्यांच्या या टोकाच्या पावलाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेमुळे पिंपळे खुर्द परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. धरणगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. मानवी जीवनाला आणि कर्तव्याला सर्वोच्च स्थान देत जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने दाखवलेली ही तत्परता अत्यंत कौतुकास्पद ठरली आहे. ८० फूट खोल विहिरीतून मृतदेह सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे कठीण काम जवानांनी गावकरी व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने पूर्ण केले. सध्या पोलीस प्रशासन या घटनेच्या सर्व बाजूंचा सखोल तपास करत आहे.



