Home आरोग्य रोटारॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटचा ‘नवपर्व’ पदग्रहण सोहळा उत्साहात

रोटारॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटचा ‘नवपर्व’ पदग्रहण सोहळा उत्साहात

0
5

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रोटारॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटच्या वर्ष २०२६-२७ च्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा ‘नवपर्व’ पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष रोटारॅक्टर मिथिलेश खैरनार आणि सचिव रोटारॅक्टर जान्हवी सोनवणे यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. नव्या कार्यकारिणीने युवक सक्षमीकरणासह आरोग्य, शिक्षण आणि समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी संचालक रो. डॉ. प्रशांत वारके यांनी क्लबच्या वाटचालीचा आढावा घेतला. सन २०१० पासून रोटारॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिट कार्यरत असून, गेल्या १६ ते १७ वर्षांत क्लबने सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. या कार्यामुळे क्लबने जिल्ह्यातील उत्कृष्ट क्लब म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे त्यांनी सांगितले. मार्टिन ल्युथर किंग यांच्या ‘तुम्ही जगासाठी काय करता, हेच जगातील सर्वात महत्त्वाचे काम आहे’ या विचाराचा दाखला देत डॉ. प्रशांत वारके यांनी तरुण रोटारॅक्टर्सना समाजोपयोगी कार्यासाठी प्रेरित केले. रोटारॅक्ट क्लबच्या आजवरच्या सामाजिक योगदानाचा गौरव करत त्यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीला भविष्यातील वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.

यानंतर मान्यवरांच्या हस्ते कॉलरिंग आणि पदग्रहण विधी पार पडला. या विधीनंतर अध्यक्ष मिथिलेश खैरनार आणि सचिव जान्हवी सोनवणे यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. नव्या कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली क्लबच्या सामाजिक कार्याला अधिक व्यापक स्वरूप मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या सोहळ्यास क्लबचे चेअरमन रो. अजित महाजन, एडीआरआर रो. वैभव आबोटी, रोटरी व रोटारॅक्ट क्लबचे अध्यक्ष, सचिव, प्राध्यापकवर्ग तसेच मोठ्या संख्येने रोटारॅक्ट सदस्य उपस्थित होते. रो. राजीव बियाणी यांनी नवनिर्वाचित टीमला शुभेच्छा देताना रोटारॅक्ट हे युवकांना नेतृत्वगुण आणि विविध कौशल्ये विकसित करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ असल्याचे सांगितले. या माध्यमातून मिळणारा अनुभव भविष्यातील आयुष्यात निश्चितच दिशादर्शक ठरेल, असे त्यांनी नमूद केले.

नवनिर्वाचित अध्यक्ष मिथिलेश खैरनार यांनी आपल्या मनोगतात आगामी वर्षातील कार्याची दिशा स्पष्ट केली. युवक सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण आणि समाजोपयोगी उपक्रमांवर विशेष भर देत ‘नवपर्व’ अंतर्गत क्लबला नव्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत तरुणाईच्या सहभागातून सकारात्मक बदल घडवून आणण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटारॅक्टर तेजस्विनी गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी आणि सदस्यांचे आभार मानण्यात आले. ‘नवपर्व’ पदग्रहण सोहळ्यामुळे नवनिर्वाचित कार्यकारिणीसह नवोदित रोटारॅक्ट सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.


Protected Content

Play sound