मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री तथा ज्येष्ठ नेते मा. आ. एकनाथरावजी खडसे (नाथाभाऊ) यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त अमृतमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने जुनी कोथळी येथील श्री संत मुक्ताई मंदिर परिसरात रविवार, २३ ऑगस्ट रोजी धर्मध्वजारोहण सोहळा होणार असून, त्यानंतर विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
अमृतमहोत्सवी सोहळ्याचा शुभारंभ धर्मध्वजारोहणाने करण्यात येणार आहे. रविवार, २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता श्री संत मुक्ताई मंदिर परिसरात हा पवित्र सोहळा पार पडणार आहे. सतपंथ आचार्य प.पू. महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या शुभहस्ते धर्मध्वजाचे विधिवत ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला ह.भ.प. रविंद्र हरणे महाराज, ह.भ.प. भरत महाराज बेळीकर, ह.भ.प. रमेश महाराज आडविहिरकर, संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲड. रविंद्र भैय्यासाहेब पाटील तसेच ह.भ.प. विशाल महाराज खोले यांच्यासह परिसरातील प्रमुख कीर्तनकार, वारकरी बांधव आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. एकनाथराव खडसे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित या सोहळ्यात श्री संत मुक्ताई चरित्र कथा आणि भागवत कथा सप्ताहासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरात धार्मिक वातावरण निर्माण होणार असून, वारकरी आणि भाविकांसाठी हा सोहळा विशेष आकर्षणाचा ठरणार आहे.
धर्मध्वजारोहण सोहळ्यानंतर आगामी धार्मिक कार्यक्रमांच्या नियोजनासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत विविध कार्यक्रमांच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर उपस्थित भाविक, वारकरी आणि मान्यवरांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. एकनाथराव खडसे यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या अमृतमहोत्सवी धार्मिक सोहळ्याला भाविक भक्त, वारकरी बांधव, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मा. आ. एकनाथराव खडसे अमृतमहोत्सवी समितीच्या वतीने करण्यात आले आहे.



