Home Cities जळगाव मनपाचा बीव्हीजीला अखेर अल्टीमेटम! ‘एक महिना काम सुधारा, नाहीतर ब्लॅकलिस्ट’चा सभापतींचा इशारा

मनपाचा बीव्हीजीला अखेर अल्टीमेटम! ‘एक महिना काम सुधारा, नाहीतर ब्लॅकलिस्ट’चा सभापतींचा इशारा

0
15

जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत शहरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, मुजोर अधिकारी आणि आरोग्य यंत्रणेच्या खालावलेल्या दर्जावरून नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त केला. कोट्यवधी रुपयांचे कंत्राट उकळूनही जळगाव शहरात घाणीचे साम्राज्य पसरवणाऱ्या ‘बीव्हीजी’ (BVG) कंपनीच्या ढिसाळ कारभारावर लोकप्रतिनिधींनी कडक शब्दांत ताशेरे ओढले. या गंभीर परिस्थितीची दखल घेत सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी बीव्हीजी कंपनीला काम सुधारण्यासाठी एका महिन्याची शेवटची मुदत (अल्टीमेटम) दिली असून, या कालावधीत शहराची स्वच्छता न झाल्यास कंपनीला थेट ‘ब्लॅकलिस्ट’ करण्याचे स्पष्ट आणि कडक निर्देश महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मनपाच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत सुरुवातीपासूनच नगरसेवकांनी आरोग्य, मोकाट कुत्रे, स्वच्छता, अग्निशमन आणि नगररचना विभागाच्या शून्य कामगिरीवरून प्रशासनाला पुरते धारेवर धरले. वॉर्ड क्रमांक ५ सह संपूर्ण शहरात बीव्हीजी कंपनी कचरा उचलण्यास प्रचंड दिरंगाई करत असल्याचा आरोप नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी केला. “बीव्हीजीचे नाव मोठे अन् लक्षण खोटे अशी सद्यस्थिती असून महापालिका कोट्यवधी रुपये उधळत असतानाही शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे; मग नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या कंपनीवर दंडात्मक कारवाई का केली जात नाही?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. नगरसेवक नितीन सपके यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मुजोरीचा पाढा वाचत, तक्रारींवर घंटागाड्या नादुरुस्त असल्याचे सांगून लोकप्रतिनिधींना न जुमानणाऱ्या या कंपनीला तात्काळ घरचा रस्ता दाखवण्याची मागणी केली.

बैठकीत शहरातील बहुमजली इमारती आणि कोचिंग क्लासेसच्या सुरक्षेचा मुद्दाही चांगलाच तापला. नगरसेवक नितीन सपके यांनी खाजगी व्यावसायिक कॉम्प्लेक्स आणि कोचिंग क्लासेसमध्ये अग्निशमन यंत्रणाच नसल्याने मोठ्या अपघाताची भीती व्यक्त केली. यावर सभापतींनी शहरातील धोकेदायक वास्तूंची तात्काळ तपासणी करून पुढील बैठकीत सविस्तर ‘फायर ऑडिट’ अहवाल सादर करण्याचे निर्देश अग्निशमन विभागाला दिले. तसेच, अग्निशमन विभागाच्या बंब निघण्याच्या मुख्य मार्गावरच अतिक्रमाणाचा बिडखा पडल्याने आगीची घटना घडल्यास गाड्या बाहेर पडण्यास विलंब होतो, हा गंभीर प्रश्न नगरसेवक दीपक सूर्यवंशी यांनी मांडला. त्यावर अतिक्रमाणावर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे आदेश सभापतींनी दिले.

नगररचना विभागाच्या मनमानी कारभारावरही या बैठकीत ताशेरे ओढण्यात आले. तब्बल सात पत्रे देऊनही आणि वारंवार सूचना करूनही ऑडिट सादर न करणाऱ्या तसेच निधीच्या उपलब्धतेबाबत माहिती दडवणाऱ्या नगररचना विभागाचे अधिकारी अमोल पाटील यांच्या बेशिस्त वागणुकीबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. सभापतींनी या मुजोर अधिकाऱ्यावर कडक शिस्तभंगाची कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश उपायुक्तांना दिले. दुसरीकडे, पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरियाचा धोका वाढत असताना मनपाच्या गोलाणी मार्केटच्या तळमजल्यावर घाण पाण्याचे मोठे डबके साचल्याचे नगरसेवक अरविंद देशमुख यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर आरोग्य विभागाला तातडीने विशेष स्वच्छता मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच व्यापारी गाळेधारकांच्या प्रलंबित प्रश्नांवर लवकरच संबंधित मंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

महानगरपालिकेच्या स्थायी समिती बैठकीत बीव्हीजी कंपनीच्या निकृष्ट कचरा संकलनावर १ महिन्याचा अल्टीमेटम देऊन ब्लॅकलिस्टचा इशारा देण्यात आला असून, नगररचना विभागाच्या मुजोर अधिकाऱ्यावर कारवाई, इमारतींचे फायर ऑडिट आणि गोलाणी मार्केटमधील स्वच्छतेबाबत कडक आदेश पारित करण्यात आले आहेत.

गाळेधारकांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, २३६८ भाडेकराराचे नूतनीकरण तात्काळ करावे, अशी मागणी अरविंद देशमुख यांनी केली.
केली. हा प्रश्न मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आ. राजूमामा भोळे यांच्या माध्यमातून मार्गी लावण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.


Protected Content

Play sound