जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वृद्ध वैद्यकशास्त्राचा अभ्यास करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मिळणारे अद्ययावत ज्ञान आणि अनुभव विद्यार्थ्यांसाठी मोठी संपत्ती असून, त्याचा भविष्यातील वैद्यकीय कारकिर्दीत निश्चितच उपयोग होईल, असे प्रतिपादन गोदावरी हेल्थ सिटीचे चेअरमन डॉ. उल्हास पाटील यांनी केले.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या जनरल मेडिसीन विभागातर्फे ‘वृद्ध वैद्यकशास्त्र : प्रतिबंधापासून उपशामक उपचारापर्यंत’ या विषयावर एकदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. उल्हास पाटील मार्गदर्शन करत होते. परिषदेला वैद्यकीय क्षेत्रातील तब्बल ५०० प्रतिनिधींनी नोंदणी केल्याने कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

परिषदेच्या प्रारंभी डॉ. उल्हास पाटील यांच्या उपस्थितीत बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. अनिता बसवराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच स्व. गोदावरी पाटील व धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, संचालक डॉ. एन. एस. आर्विकर, हृदयविकार विभागप्रमुख डॉ. वैभव पाटील, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, मेडिसीन विभागप्रमुख डॉ. सी. डी. सारंग, सचिव डॉ. युवराज बढे, डॉ. प्रमोद उमर्जी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
डॉ. उल्हास पाटील यांनी विद्यार्थ्यांना परिषदेत सहभागी झालेल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून प्रत्यक्ष अनुभवाधारित ज्ञान घेण्याचे आवाहन केले. वृद्ध वैद्यकशास्त्र हा सध्याच्या काळातील महत्त्वाचा विषय असून, त्याचा सखोल अभ्यास करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. परिषदेत तज्ज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनाच्या लेखी नोंदी विद्यार्थ्यांनी करून घ्याव्यात, असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी त्यांनी बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना प्रा. डॉ. डी. के. मित्रा यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनाच्या आठवणींनाही उजाळा दिला.
वैद्यकीय क्षेत्रात प्रत्येक क्षणी नवे बदल होत आहेत. या बदलांशी विद्यार्थ्यांनी सतत अद्ययावत राहावे, यासाठी महाविद्यालयात परिषद, कार्यशाळा, प्रश्नमंजुषा तसेच राज्यस्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते, असे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी सांगितले. जनरल मेडिसीन विभागाने आयोजित केलेल्या या परिषदेचे त्यांनी कौतुक केले.
परिषदेचे प्रास्ताविक आयोजन समितीचे चेअरमन डॉ. सी. डी. सारंग यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. स्वानंद झंवर, डॉ. सृष्टी सोनपसारे आणि डॉ. खुशी सुराणा यांनी केले. परिषद यशस्वी करण्यासाठी डॉ. तन्मय मेहता यांनी विशेष परिश्रम घेतले.
परिषदेत डॉ. सी. ए. कांते, डॉ. पल्लवी बढे, डॉ. अभय जोशी, डॉ. विजया दाते, डॉ. अनिता बसवराज, डॉ. अपर्णा साधळे, डॉ. अंजली शेटे, डॉ. प्रमोद उमर्जी, डॉ. भूषण चोपडे, डॉ. चिमू चिंते, डॉ. गुणवंत महाजन, डॉ. सी. डी. सारंग, डॉ. युवराज बढे आणि डॉ. रोशन राजपूत या तज्ज्ञांनी वृद्ध वैद्यकशास्त्रातील विविध पैलूंवर मार्गदर्शन केले.



