रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर नगरपालिकेच्या हद्दीत वर्षभरापूर्वी लाखो रुपये खर्च करून रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच या कामाची अवस्था पुन्हा बिकट झाली असून अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडले आहे. त्यामुळे जनतेच्या पैशातून झालेल्या या कामाच्या गुणवत्तेवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून नगरपालिका प्रशासनाने तातडीने चौकशी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
रावेर शहरातील पारा गणपती परिसर, नागझिरी रोड, थडा भाग तसेच दत्त मंदिर परिसरात मागील वर्षी खड्डे दुरुस्तीच्या नावाखाली डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून या रस्त्यांवरील डांबरीकरण ठिकठिकाणी उखडले असून पुन्हा खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे वाहनचालक, पादचारी आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या कामासाठी नगरपालिकेकडून दहा लाख रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च झाल्याची माहिती समोर येत असून, एवढा मोठा खर्च करूनही रस्ते काही महिन्यांतच खराब झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. सार्वजनिक निधीतून होणाऱ्या विकासकामांचा दर्जा तपासला जातो का, कामाची गुणवत्ता पाहण्यासाठी संबंधित अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करतात का, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

रावेरमधील काही सुशिक्षित बेरोजगार ठेकेदारांनीही या कामाच्या गुणवत्तेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. एवढ्या मोठ्या रकमेत दर्जेदार पद्धतीने काम केले असते तर संबंधित रस्ता किमान काही वर्षे टिकला असता, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे वापरण्यात आलेले साहित्य, कामाची पद्धत, प्रत्यक्ष खर्च आणि कामाच्या गुणवत्तेची तांत्रिक तपासणी करण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे संबंधित ठेकेदाराचीही या रस्त्यावरून नियमित रहदारी असल्याची चर्चा असून, त्याने केलेल्या कामाची सध्याची अवस्था त्याच्याच नजरेसमोर असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
जनतेच्या पैशातून करण्यात येणारी विकासकामे टिकाऊ आणि दर्जेदार असणे आवश्यक आहे. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना भविष्यात नगरपालिका हद्दीत कोणतीही कामे देऊ नयेत, तसेच दोष सिद्ध झाल्यास संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, ‘सुंदर रावेर’चे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी नगराध्यक्ष संगीता महाजन तसेच नगरसेवकांनी शहरातील रस्त्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी युवकांकडून होत आहे. रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता तपासून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी आणि उखडलेल्या ठिकाणी पुन्हा दर्जेदार पद्धतीने दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही रस्ते काही महिन्यांतच पुन्हा उखडल्याने रावेर शहरात संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे आता ‘ठेकेदार मस्त, नगरपालिका गप्प आणि नागरिक त्रस्त’ अशी चर्चा शहरात रंगली असून, नगरपालिका प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेते, याकडे रावेरकरांचे लक्ष लागले आहे.



