Home Cities जळगाव दाणा बाजारात अतिक्रमण निर्मूलनाची धडक कारवाई ; व्यापाऱ्यांनी स्वतःहून अतिक्रमण हटवण्यास सुरुवात

दाणा बाजारात अतिक्रमण निर्मूलनाची धडक कारवाई ; व्यापाऱ्यांनी स्वतःहून अतिक्रमण हटवण्यास सुरुवात

0
12

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील दाणा बाजार परिसरात गुरुवारी सकाळी साडेदहा वाजेपासून अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने धडक कारवाईला सुरुवात केली. नेताजी सुभाष चौक पुतळ्यापासून सुरू झालेल्या या कारवाईदरम्यान तीन दुकानांवरील अतिक्रमण हटविण्यात आल्यानंतर काही व्यापारी आक्रमक झाले. त्यामुळे परिस्थिती चिघळू नये यासाठी टीपी विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावण्यात आले.

ही कारवाई उपायुक्त पंकज गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन अधीक्षक संजय ठाकूर यांच्या पथकाने केली. पथकाने सुभाष पुतळ्यापासून कारवाईला सुरुवात करत रस्त्यालगत करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली. कारवाईदरम्यान तीन दुकानांवरील अतिक्रमण हटविल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. काही व्यापारी आक्रमक झाल्याने प्रशासनाकडून टीपी विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अतिक्रमित जागेची पाहणी करून व्यापाऱ्यांना मार्किंग करून देण्यात आली.

मार्किंग केल्यानंतर व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या कारवाईला प्रतिसाद देत स्वतःहून अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही काळ निर्माण झालेला तणाव कमी झाला आणि कारवाईची प्रक्रिया पुढे सुरू राहिली. दरम्यान, दाणा बाजार परिसरातील उर्वरित अतिक्रमणांवर सोमवारी पुन्हा कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या कारवाईकडे व्यापारी आणि परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासह सार्वजनिक रस्ते आणि परिसर अतिक्रमणमुक्त करण्याच्या उद्देशाने प्रशासनाकडून ही मोहीम राबविण्यात येत आहे. व्यापाऱ्यांनीही प्रशासनाने केलेल्या मार्किंगनुसार स्वतःहून अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केल्याने पुढील कारवाईला काही प्रमाणात सहकार्य मिळत असल्याचे चित्र दिसून आले.


Protected Content

Play sound