Home Cities यावल जर्मनीत विरावलीच्या सुपुत्राची अभिमानास्पद कामगिरी ; समीर पाटील यांना ‘Best Thesis Award’

जर्मनीत विरावलीच्या सुपुत्राची अभिमानास्पद कामगिरी ; समीर पाटील यांना ‘Best Thesis Award’

0
20

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील विरावली येथील रहिवासी आणि सध्या किनगाव येथे वास्तव्यास असलेल्या एस.बी. पाटील व सुजाता पाटील यांचे चिरंजीव समीर पाटील यांनी जर्मनीत उच्च शिक्षण घेताना उल्लेखनीय शैक्षणिक व संशोधनात्मक कामगिरी करून यावल तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. जर्मनीतील IU International University of Applied Sciences येथून संगणकशास्त्रातील मास्टर्स पदवी पूर्ण करताना त्यांनी आपल्या मास्टर्स प्रबंधासाठी तब्बल १०० पैकी ९८.४ गुण मिळवत १.० ही सर्वोच्च श्रेणी प्राप्त केली. त्यांच्या उत्कृष्ट संशोधनकार्याची दखल घेत त्यांना प्रतिष्ठेचा ‘Best Thesis Award’ प्रदान करून पदवीदान समारंभात गौरविण्यात आले.

समीर पाटील यांच्या मास्टर्स प्रबंधाचा विषय “Design and Implementation of an End-to-End Automation Pipeline for Semiconductors in the Area of Product Management” असा होता. जर्मनीतील आघाडीची कंपनी Bosch यांच्या सहकार्याने त्यांनी प्रत्यक्ष औद्योगिक समस्येवर आधारित हा प्रकल्प विकसित केला. त्यामुळे त्यांच्या संशोधनाला केवळ शैक्षणिक महत्त्व न राहता प्रत्यक्ष उद्योगक्षेत्राशी जोडलेली उपयुक्तता प्राप्त झाली.

सेमीकंडक्टर क्षेत्रातील उत्पादन नियोजनाशी संबंधित विविध स्रोतांमध्ये विखुरलेल्या डेटाचे सुरक्षित, विश्वासार्ह आणि कार्यक्षम पद्धतीने व्यवस्थापन व विश्लेषण करण्यासाठी समीर यांनी एंड-टू-एंड ऑटोमेशन पाइपलाइन विकसित केली. विविध ठिकाणांहून उपलब्ध होणाऱ्या माहितीचे एकत्रीकरण करून ती अधिक सुसंगत आणि विश्वासार्ह स्वरूपात उपलब्ध करून देणे, हा या प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग होता. या तंत्रज्ञानाधारित उपायामुळे उत्पादन नियोजन प्रक्रियेत मोठी कार्यक्षमता निर्माण झाली. प्रकल्पाच्या अंमलबजावणीनंतर प्रक्रियेतील मॅन्युअल कामाचा सुमारे ६७ टक्के भार कमी झाला. त्याचबरोबर डेटाच्या गुणवत्तेतही सुधारणा झाली असून, विविध स्रोतांमधील माहिती एका केंद्रीकृत आणि विश्वासार्ह डेटास्रोतामध्ये उपलब्ध होण्यास मदत झाली. डेटा व्यवस्थापनातील या सुधारणेमुळे उत्पादन नियोजनाशी संबंधित निर्णय अधिक जलद आणि अचूक पद्धतीने घेणे शक्य झाले. त्याचबरोबर उद्योगासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या डेटा-आधारित निर्णय प्रक्रियेला चालना मिळाली. या प्रकल्पामुळे Bosch साठी लक्षणीय वार्षिक खर्च बचतीची संधी निर्माण झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

समीर यांच्या प्रबंधाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे हा प्रकल्प केवळ शैक्षणिक प्रयोगापुरता मर्यादित राहिला नाही. सेमीकंडक्टर उत्पादन व्यवस्थापनातील प्रत्यक्ष समस्या ओळखून उद्योगाच्या गरजांनुसार कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाधारित उपाय विकसित करण्यात त्यांनी यश मिळविले. त्यामुळे त्यांच्या संशोधनाला शैक्षणिक गुणवत्तेसोबतच औद्योगिक उपयुक्ततेचीही जोड मिळाली. मास्टर्स प्रबंधासाठी १०० पैकी ९८.४ गुण आणि १.० ही सर्वोच्च श्रेणी मिळविण्यासोबतच ‘Best Thesis Award’ मिळाल्याने समीर यांच्या संशोधनकार्याला विशेष मान्यता मिळाली आहे. AI आणि Data क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्यक्ष उद्योगसमस्या सोडविण्याच्या दिशेने त्यांनी केलेली ही कामगिरी भारतीय विद्यार्थ्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता, संशोधनक्षमता आणि कौशल्याचे दर्शन घडविणारी ठरली आहे.

समीर पाटील यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल यावल शहराच्या नगराध्यक्ष छाया अतुल पाटील, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, अजय पाटील, ॲड. देवकांत पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, विजय पाटील, साकळीचे लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील, माजी शिक्षण सभापती रवींद्र पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आर.जी. पाटील (नाना) यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे कौतुक करून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. विरावली आणि किनगावसह संपूर्ण यावल तालुक्यासाठी समीर पाटील यांचे हे यश अभिमानाची बाब ठरले आहे. जर्मनीसारख्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक आणि औद्योगिक वातावरणात आपल्या ज्ञान व कौशल्याचा ठसा उमटवत त्यांनी मिळविलेली ही कामगिरी उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.


Protected Content

Play sound