Home Cities जळगाव जळगावच्या भगिनींच्या प्रेमाची राखी सैनिक बांधवांच्या मनगटावर ; नारीशक्ती संस्थेतर्फे ५०० राख्या...

जळगावच्या भगिनींच्या प्रेमाची राखी सैनिक बांधवांच्या मनगटावर ; नारीशक्ती संस्थेतर्फे ५०० राख्या रवाना

0
4

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावताना आपल्या कुटुंबापासून दूर राहणाऱ्या सैनिक बांधवांसाठी जळगावच्या भगिनींनी प्रेम, आपुलकी आणि कृतज्ञतेचा संदेश देत रक्षाबंधनानिमित्त ५०० राख्या पाठवल्या आहेत. नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविला जात असून, यंदाही मोठ्या उत्साहात राख्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या माध्यमातून सीमेवर कार्यरत जवानांसाठी रवाना करण्यात आल्या.

रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे आणि नात्याचे प्रतीक असलेला सण आहे. मात्र, देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना अनेकदा आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून हा सण साजरा करावा लागतो. ही भावना लक्षात घेऊन नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेने मागील पाच वर्षांपासून सैनिक बांधवांसाठी राख्या पाठविण्याचा उपक्रम आपले सामाजिक कर्तव्य म्हणून सुरू ठेवला आहे. यावर्षी संस्थेच्या वतीने ५०० राख्या तयार करून त्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. या राख्या देशाच्या सीमेवर तसेच विविध ठिकाणी कर्तव्य बजावणाऱ्या सैनिक बांधवांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. जळगावच्या भगिनींच्या प्रेमाचा आणि आस्थेचा हा धागा सैनिकांच्या मनगटावर बांधला जाणार असून, त्यातून त्यांना आपल्या कुटुंबीयांची आणि समाजाची भावनिक साथ मिळणार आहे.

या राख्या एस मराठा लाईट इन्फंट्री बटालियन, अरुणाचल प्रदेश तसेच अयोध्या, उत्तर प्रदेश येथे तैनात असलेल्या सैनिक बांधवांसाठी पाठविण्यात आल्या आहेत. राख्या सुरक्षितपणे संबंधित जवानांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे सोपविण्यात आली आहे. राख्या सुपूर्द करण्याच्या प्रसंगी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर निलेश पाटील, कल्याण संघटक विश्वनाथ उगले आणि वसतिगृह अधीक्षक समाधान धनगर उपस्थित होते. त्यांनी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. सैनिकांच्या सेवेला समाजाकडून मिळणारा हा भावनिक सन्मान महत्त्वाचा असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.

नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मनिषा पाटील यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी आशा मौर्य, नूतन तासखेडकर, वंदना मंडावरे, किमया पाटील, रेणुका हिंगू, हर्षा गुजराती, तेजल वनरा, सुगन पाटील, मनोज कापले, रतिलाल महाजन आणि विनायक महाजन आदी उपस्थित होते. सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी पाठविण्यात आलेली प्रत्येक राखी ही केवळ धागा नसून त्यामागे जळगावच्या भगिनींचे प्रेम, आदर आणि कृतज्ञतेची भावना आहे. कुटुंबापासून दूर असलेल्या सैनिकांना रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या बहिणींच्या प्रेमाची आठवण करून देणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरत आहे.


Protected Content

Play sound