चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहरात जागतिक फोटोग्राफी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील फोटोग्राफर्सच्या उपस्थितीत आयोजित या विशेष कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावत फोटोग्राफीच्या बदलत्या स्वरूपावर आणि समाजातील फोटोग्राफरच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भाष्य केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार भाऊसाहेब थोरात होते.
जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता शहरातील नारायणवाडी परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या भवनात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन आणि स्वागतगीताने झाली. पंकज पाटील यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात, डीवायएसपी सुनील पाटील, नगराध्यक्षांच्या वतीने त्यांचे सासरे रवींद्र पाटील, उपनगराध्यक्ष पंकज बोरोले, सहाय्यक गटविकास अधिकारी अनिलकुमार विसावे, उद्योजक विश्वनाथ अग्रवाल, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जयदेव देशमुख, जिजाबराव नेरपगारे, प्रमोद कंखरे, दीपक बारी, जळगाव येथील विशाल गुप्ता, सुशांक डिजिटलचे संचालक छोटू वारडे, कवी रमेश जे. पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि शहरातील फोटोग्राफर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी फोटोग्राफी क्षेत्रातील बदलत्या संधींकडे लक्ष वेधले. बहुतांश ठिकाणी तरुण कार्यकर्ते आणि युवक फोटोग्राफी क्षेत्रात पुढे येत आहेत. मात्र, या क्षेत्रात महिलांनीही मोठ्या संख्येने पुढे येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या विकासामुळे फोटोग्राफीचे क्षेत्रही आता कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
डीवायएसपी सुनील पाटील यांनी फोटोग्राफरच्या सामाजिक आणि प्रशासकीय भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले. फोटोग्राफर हा समाजाचे नाक, कान आणि डोळे असल्याचे सांगत त्यांनी एखाद्या घटनेचे वास्तव चित्र समाजासमोर आणण्यात फोटोग्राफरची भूमिका महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले. पोलिसांच्या कामकाजातही अनेकदा फोटोग्राफरची गरज भासत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. उपनगराध्यक्ष पंकज बोरोले आणि प्रमोद कंखरे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करून फोटोग्राफी क्षेत्रातील व्यक्तींना जागतिक फोटोग्राफी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात फोटोग्राफर्सनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आपल्या कौशल्याला आधुनिकतेची जोड द्यावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी रमेश पाटील यांनी केले. उपस्थित मान्यवर आणि फोटोग्राफर्सचे छोटू वारडे, योगेश राजपूत, अजहर तेली, युनुस शेख, विनोद जाधव, अशपाक तेली, अकलेश माळी, ज्ञानेश्वर सैंदाणे, शाहरुख शेख, प्रशांत चांदे, जावेद शेख, विनोद मोरे, शाकीर शेख, मनीष चौधरी, ऋषिकेश पाटील, मोसिन शेख, दर्शन सोनार, गणू कलाल, चंद्रकांत पाटील, सचिन बडगुजर, तारीख शेख, नाना सोनगिरे, लीलाधर कोळी, विनोद पाटील भोकर, हेमकांत देवराज, संजय सोनवणे, प्रकाश पवार, कुणाल महाजन, भरत पाटील, योगेश शर्मा, कृष्णा जाधव, रामचंद्र कोळी, जयेश कोळी, सुदर्शन पाटील, योगेश कोळी, दीपक पाटील, साहिल बाविस्कर, निखिल सोनार आणि लीलाधर पाटील आदींनी स्वागत केले.
फोटोग्राफी क्षेत्रातील व्यावसायिक, छायाचित्रकार आणि उपस्थित मान्यवरांनी एकमेकांना जागतिक फोटोग्राफी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. फोटोग्राफी ही केवळ व्यवसायाची बाब नसून एखाद्या क्षणाला कायमस्वरूपी जतन करणारी आणि समाजातील घटनांचे दस्तऐवजीकरण करणारी कला असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. संदीप पाटील यांनी केले. फोटोग्राफर्सच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. आधुनिक तंत्रज्ञान, एआय आणि डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावाच्या काळातही फोटोग्राफी कलेचे महत्त्व कायम असून, नव्या पिढीने या क्षेत्रात अधिकाधिक संधी निर्माण कराव्यात, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.



