Home प्रशासन फैजपूर पोलिसांची वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर धडक कारवाई ; दोन दिवसांत ७८ केसेस,...

फैजपूर पोलिसांची वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर धडक कारवाई ; दोन दिवसांत ७८ केसेस, ४९ हजार ३०० रुपयांचा दंड

0
27

फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । फैजपूर शहरातील वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध करण्यासाठी आणि नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर अंकुश ठेवण्यासाठी फैजपूर पोलिसांनी विशेष मोहीम राबविली. १७ आणि १८ ऑगस्ट रोजी छत्री चौक तसेच सुभाष चौक परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर तब्बल ७८ केसेस करण्यात आल्या. या कारवाईत एकूण ४९ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

१७ ऑगस्ट रोजी पोलिसांनी विविध प्रकारच्या वाहतूक नियमभंगांविरोधात कारवाई केली. विनापरवाना वाहन चालविणे, फॅन्सी नंबर प्लेट, हेल्मेटचा वापर न करणे, पोलिसांच्या इशाऱ्याचे उल्लंघन, अतिरिक्त प्रवासी वाहून नेणे, फ्रंट सीटवर प्रवासी बसविणे, ट्रिपल सीट प्रवास, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे तसेच नो-पार्किंगमध्ये वाहन उभे करणे आदी नियमभंगांवर कारवाई करण्यात आली. या दिवशी एकूण ३९ केसेस करण्यात आल्या असून, २३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अवैध प्रवासी वाहतुकीच्या दोन केसेस न्यायालयीन प्रक्रियेसाठी प्रलंबित आहेत.

पोलिसांनी १८ ऑगस्ट रोजीही ही विशेष मोहीम सुरू ठेवली. या दिवशी विनापरवाना वाहन चालविणे, फॅन्सी नंबर प्लेट, विनाहेल्मेट वाहन चालविणे, अतिरिक्त प्रवासी वाहून नेणे, फ्रंट सीटवर प्रवासी बसविणे, ट्रिपल सीट प्रवास आणि नो-पार्किंग अशा विविध नियमभंगांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतही ३९ केसेस नोंदविण्यात आल्या असून, २६ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अवैध प्रवासी वाहतुकीची एक केस न्यायालयीन प्रक्रियेसाठी प्रलंबित आहे.

दोन दिवसांत पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनचालकांमध्ये चांगलीच धावपळ उडाली. शहरातील प्रमुख चौक आणि वर्दळीच्या ठिकाणी पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या तपासणीमुळे नियमांचे पालन करण्याबाबत वाहनचालकांमध्ये जागरूकता निर्माण होण्यास मदत होत आहे.

फैजपूर पोलिसांकडून यापुढेही वाहतूक नियमभंग करणाऱ्यांविरोधात अशाच प्रकारच्या विशेष मोहिमा राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. केवळ दंडात्मक कारवाई करण्याऐवजी वाहनचालकांनी स्वतःहून वाहतूक नियमांचे पालन करून अपघातांना आळा घालावा, यावर पोलिसांनी भर दिला आहे.

फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी नागरिक आणि वाहनचालकांना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. लहान मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये, वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर करू नये, दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा तसेच दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास टाळावा, असे त्यांनी स्पष्ट केले.


Protected Content

Play sound